पुद्दुचेरी - येत्या काही महिन्यात पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांची नायब राज्यपाल पदावरुन अचानक उचलबांगडी करण्यात आली होती. त्यानंतर आज तामिळसाई सौंदराराजन यांनी गुरुवारी पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून औपचारिकपणे कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच त्यांनी काँग्रेस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
आदेशानुसार, मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना 22 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता विधानसभेत बहूमत सिद्ध करावं लागणार आहे. बहुमत गमावल्याने मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे तर आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी केला आहे.
पुद्दुचेरीत काँग्रेसचे सरकार अल्पमतात -
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. 33 सदस्य असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत आता काँग्रेसकडे केवळ 14 आमदार राहिले आहेत. अल्पमतात आलेलं काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी राहुल गांधी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.
पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक -
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी असलेल्या डीएमकेने 4 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता.