पुद्दुचेरी - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक एका टप्प्यात 6 एप्रिलला होणार आहे. 30 जागांसाठी आमदार निवडले जातील. 2 मे रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मात्र काही दिवसांपूर्वीच येथील सरकार कोसळलं आहे.
पुद्दुचेरी हे केंद्रशासित आणि लहान राज्य आहे. 30 निर्वाचित आमदार आणि तीन नामनिर्देशित आमदार मिळून 33 आमदारांची विधानसभा आहे. पण भारतीय जनता पक्षाने हे छोटे राज्य काँग्रेसकडून खेचून घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्तेत येत, की काँग्रेसच्या हातातून हे राज्य निसटतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील नारायणसामी सरकार कोसळल्यानंतर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. नुकतच राहुल गांधी यांनी पुद्दुचेरीचा दौरा केला असून तेथील लोकांना आपल्याकडे वळण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुदुच्चेरीचाही दौरा केला. पुद्दुचेरीतील कारिकल जिल्ह्यातील NH45-A या ५६ कि.मी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. सुमारे 2 हजार 426 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. याच जिल्ह्यात मोदी मेडिकल कॉलेजच्या इमारतीचीही पायाभरणी केली. हा प्रकल्प सुमारे 491 कोटी रुपयांचा आहे. पुद्दुचेरीत एका बंदराच्या कामाचा शुभारंभही मोदींच्या हस्ते होणार आहे. मोदींनी अनेक प्रकल्प पुद्देचेरीला देत तेथील लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
पुद्दुचेरीतील संख्याबळ -
2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. तर काँग्रेसचा सहकारी असलेल्या डीएमकेने 3 जागा जिंकल्या होत्या. तर एका अपक्ष आमदारानेही त्यांना पाठिंबा दिला होता. पुद्दुचेरी विधानसभेत बहुमताचा आकडा 16 आहे.
एकेकाळी दक्षिणेत काँग्रेसचा बोलबाला होता. आज पुद्दुचेरीसारखे लहान राज्यही त्यांच्या हाती उरले नाही. देशात आता पंजाब, राजस्थान व छत्तीसगढ येथेच काँग्रेसची सरकारे उरली आहेत. महाराष्ट्र व झारखंडमध्ये आघाडी सरकारात काँग्रेस सामील आहे.