पुद्दुचेरी - पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी 6 एप्रिल रोजी म्हणजे आज एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पुद्दुचेरी एक केंद्रशासित प्रदेश आहे. दिल्लीप्रमाणेच येथेही निवडणूक होते. मुख्यमंत्री आणि नामांकित उपराज्यपाल आहेत. पुद्देचेरी विधानसभेत 30 जागा आहेत. ज्यासाठी 6 एप्रिल म्हणजे आज मतदान होणार आहे. येथे बहुमताचा आकडा 16 आहे.
2016 मध्ये काँग्रेसचा विजय, मात्र, सत्ता कोसळली
2016 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 15 जागांवर विजय मिळविला होता. अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमने ( एआयएडीएमके) 4 जागांवर विजय मिळवला होता. तर अखिल भारतीय एन.आर. काँग्रेसने ( एआयएनआरसी) 8 जागा काबीज केल्या होत्या. द्रविड मुन्नेत्र कळघमने (डीएमके) 2 जागांवर विजय मिळवला होता. तर एक अपक्ष निवडूण आला होता. अशाप्रकारे 2016 मध्ये काँग्रेस द्रमुक आघाडीने पुद्दुचेरीमध्ये सरकार स्थापन केले आणि व्ही. नारायणसामी पुद्दुचेरीचे दहावे मुख्यमंत्री बनले. पण 22 फेब्रुवारी रोजी नारायणसामी यांनी बहूमत गमावल्याने पदाचा राजीनामा दिला होता. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. आता काँग्रेस पुन्हा सत्तेत येत, की काँग्रेसच्या हातातून हे राज्य निसटतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस आणि डीएमकेमध्ये युती आहे. तर एआयएडीएमके आणि एआयएनआरसी विरोधी पक्ष आहेत.
आज मतदान
पुद्दुचेरीच्या एकूण 30 विधानसभा जागांपैकी 5 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. एकूण 10,03,681 मतदार आहेत. त्यापैकी 4,72,736 पुरुष आणि 5,30,828 महिला मतदार आहेत. त्याशिवाय 117 तृतीय लिंग मतदार आहेत. येथे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पुरुष मतदारांपेक्षा एकूण महिला मतदारांची संख्या जास्त आहे.
एकूण 30 जागांसाठी 324 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 36 उमेदवार राष्ट्रीय व 64 उमेदवार प्रादेशिक पक्षांचे आहेत. तर 108 उमेदवार नोंदणीकृत अपरिचित पक्षाचे आहेत. पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत 116 अपक्षही उमेदवारीह रिंगणात आहेत.
कोणाचे किती उमेदवार रिंगणात
यावेळी एकूण 20 राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. जास्तीत जास्त एनटीके पक्षाने 28 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. त्याचबरोबर डीएमडीकेचे 26, एएमएमके पक्षाचे 25, एमएनएमचे 22, आयजेके पक्षाचे 21, अखिल भारतीय एनआर काँग्रेसचे 16, काँग्रेसचे 14, डीएमकेचे 13, बसपाचे 11, भाजपाचे 9, एआयएडीएमकेचे 4 आणि इतर दलांचे 18 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच यावेळी 36 महिला उमेदवारही रिंगणात आहेत. हा आकडा 2016 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त आहे. मागील विधानसभा निवडणुकीत एकूण 26 महिला रिंगणात होत्या.
हेही वाचा - बीजापूर हल्ल्यात नक्षलवाद्यांनी जम्मू-काश्मिरच्या जवानाला ठेवले ओलीस