नवी दिल्ली - काँग्रेस खासदार शशी थरूर आणि काही पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांना भाजप सरकारकडून धमकावण्यात येतयं. ही निती धोकादायक आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
एफआयआर नोंदवून पत्रकार आणि लोकप्रतिनिधींना धमकावण्याची भाजपा सरकारची निती अत्यंत धोकादायक आहे. लोकशाहीचा आदर करणे ही सरकारची इच्छा नसून, जबाबदारी आहे. भीतीचे वातावरण लोकशाहीसाठी विषसारखे आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी एफआयआर नोंदवून भाजपा सरकारने लोकशाहीच्या मर्यादांचे उल्लंघन केले आहे, असे प्रियांका गांधी टि्वटमध्ये म्हणाल्या.
काय प्रकरण -
काँग्रेस खासदार शशी थरुर, पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, जफर आगा, परेशनाथ, अनंतनाग आणि विनोद यांच्याविरोधात तक्रार नोएडामध्ये दाखल करण्यात आली आहे. सांप्रदायिक तणाव निर्माण करणाऱया आणि भडकवणाऱ्या बातम्या प्रसारीत करून नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्रियांका गांधींनी महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली -
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज पुण्यतिथी असून प्रियांका गांधी यांनी बापूंना आदरांजली वाहिली. लोकांचा मत नाकारणारा राज्यकर्ता क्रूर असतो. तसेच कोणताही अन्यायकारक कायदा हा स्वत: मध्ये हिंसाचाराचा एक प्रकार आहे, असे गांधींजी म्हणाले होते. विचारांची हत्या करण्याच्या उद्देशाने गांधींचीही हत्या करण्यात आली होती. मात्र, आज गांधीजींचा सत्याग्रह ही संपूर्ण भारताची शक्ती आहे आणि आपली जबाबदारीही आहे, असे टि्वट प्रियांका यांनी केले.