बेंगळुरू : चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर उतरवल्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) टीमचे अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी इस्रोला जाणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान 3 यशस्वीपणे उतरवून इस्रोने इतिहास रचला आहे. भारत चंद्रावरील दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा जगातील पहिला देश ठरला आहे.
नरेंद्र मोदी शनिवारी बंगळुरूला जाणार : 15 व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेत गेले आहेत. तेथून 25 ऑगस्टला पंतप्रधान ग्रीसला जातील. त्यानंतर परतताना पंतप्रधान बेंगळुरूला पोहोचतील. बुधवारी चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंग दरम्यान पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेतून लाईव्ह जोडले गेले होते. मोहिमेच्या यशानंतर संबोधित करताना त्यांनी इस्रोच्या टीमचे अभिनंदनही केले होते.
असा आहे दौरा : ग्रीसहून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑगस्ट रोजी एका विशेष विमानाने बेंगळुरू येथील एचएएल विमानतळावर दाखल होतील. सकाळी 6 ते 6.30 या वेळेत पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर ते इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यासाठी रवाना होतील. तेथे सकाळी 7 ते 8 या वेळेत पंतप्रधान इस्रोच्या वैज्ञानिकांसोबत चर्चा करतील. यानंतर पंतप्रधान सकाळी 8.05 मिनिटानी बंगळुरू येथील एचएएल विमानतळाकडे रवाना होतील. सकाळी 8.35 वाजता पंतप्रधानाचे विमान बेंगळुरूहून दिल्लीसाठी उड्डाण करेल. सकाळी 11.35 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली विमानतळावर पोहचतील.
इस्रोच्या शास्त्रज्ञांचा गौरव : यापूर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी इस्रोला भेट दिली होती. त्यांनी चंद्रयान 3 प्रकल्पाच्या यशाबद्दल इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ, शास्त्रज्ञांच्या टीमचे अभिनंदन केले होते. यावेळी त्यांनी इस्रोचे प्रमुख सोमनाथ, यूआर राव, स्पेस सेंटरचे संचालक शंकरन, प्रकल्प संचालक वीरमुथू, सहाय्यक प्रकल्प संचालक कल्पना, मशीन मेंटेनन्स संचालक श्रीकांत आणि इतर शास्त्रज्ञांचा शाल पुष्पहार देऊन गौरव केला होता.
हेही वाचा -