नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान लंडनला ब्रिटनची राणी एलिझाबेथ II यांच्या शासकीय अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये त्या भारत सरकारकडून आपल्या शोक संदेश व्यक्त करणार आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 8 सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचे निधन झाले. राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी १२ सप्टेंबर रोजी येथील ब्रिटिश उच्चायुक्तालयात जाऊन भारताच्या वतीने शोक व्यक्त केला. राणीच्या निधनाबद्दल भारतानेही रविवारी राष्ट्रीय शोक जाहीर केला होता. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, महाराणी एलिझाबेथ II च्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत भारत-ब्रिटन संबंध विकसित आणि घनिष्ट झाले आहेत. कॉमनवेल्थचे प्रमुख म्हणून त्यांनी जगभरातील लाखो लोकांच्या कल्याणासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.