शिमला : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चार दिवसांच्या दौऱ्यावर शिमला येथे पोहोचल्या आहेत. आज सकाळी राष्ट्रपती मुर्मू हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने शिमला येथील छाराबरा येथील कल्याणी हेलिपॅडवर पोहोचल्या. तेथे त्यांचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी स्वागत केले. द्रौपदी मुर्मूंची ही पहिलीच शिमला भेट आहे.
राष्ट्रपतींचा नागरी सत्कार होणार : आज संध्याकाळी राजभवनात त्यांच्या सन्मानार्थ नागरी सत्कार होणार असून उद्या त्या शिमला शहरातच दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. 20 एप्रिल रोजी राष्ट्रपती निवासात 'अॅट होम' कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाईल आणि राष्ट्रपती 21 एप्रिल रोजी दिल्लीला परततील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शिमला येथे पोहचताच, राज्यपाल शिव प्रताप शुक्ला, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, शिक्षण मंत्री रोहित ठाकूर आणि इतर अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींचे शिमला येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया देखील उपस्थित होते.
राष्ट्रपती HPU च्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार : 19 एप्रिलला हिमाचल प्रदेश विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके प्रदान करतील. कार्यक्रमात 99 पीएचडी पदव्यांसह 101 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान केली जातील.
दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था : राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिमल्यात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त जवानांच्या तैनातीसोबतच शहराची 6 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. त्या अंतर्गत रस्त्यालगतच्या पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने हटवली जात आहेत. शिमल्यात रात्रीच्या वेळीच मालवाहू वाहनांना प्रवेश मिळेल, तर पर्यटकांच्या वाहनांना पद्धतशीर एंट्री पॉइंट बनवून शहरात प्रवेश दिला जात आहे. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवणार नाही.