नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ऑनलाईन कार्यक्रमात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे उद्घाटन केले. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशा घोष यांनी पंतप्रधानांसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले. व्हर्च्युअल कार्यक्रमादरम्यान मोदीविरोधात विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा
पंतप्रधान पुतळ्याचे अनावरण करीत आहेत. परंतु आजपर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्याना प्रतिसाद दिलेला नाही. विद्यापीठात फी वाढविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. ज्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकारने यासंदर्भात कधीच उत्तर दिले नाही किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम केले नाही, असे आयशा घोष म्हणाल्या.
पंतप्रधान उत्तर देत नाहीत
आपली शिक्षण व्यवस्था सतत ढासळत आहे. विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. परंतु सरकार याकडे लक्ष देत नाहीत. पंतप्रधान एका बाजूला म्हणतात की ते विद्यार्थ्यांना वादविवाद, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहीत करतात. परंतु जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो, तेव्हा आमच्या प्रश्नांची उत्तरे का दिली जात नाहीत. विद्यार्थ्यांच्या समस्या का ऐकल्या जात नाहीत, सरकार त्याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
मोदी सरकार जबाबदारी घेणार का?
विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही. मागील एक महिन्यापासून विद्यार्थी मुख्य गेट रोडवर थांबले आहेत. पण कोणीही त्यांचे ऐकत नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच गुजरात दंगल, शैक्षणिक धोरणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची जबाबदारी मोदी सरकार घेईल का, असा सवालही त्यांनी केला.
विवेकानंद यांचा पुतळा जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापेक्षा उंच -
2017 मध्ये झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत स्वामी विवेकानंदांचा पुतळा आवारात स्थापित करण्यास मान्यता देण्यात आली होती. पुतळा 2019 मध्ये पूर्ण झाला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यासमोर स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची उंची माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापेक्षा सुमारे साडेतीन फूट उंच आहे. गेल्या वर्षी एका गटाने स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता. तसेच पुतळ्याची विटंबना केल्यानंतर त्याच्याखाली भाजपविरोधात अपशब्द लिहण्यात आले होते.