तिरुवनंतपुरम- कोरोनाच्या संसर्गात नियमांचे उल्लंघन करणे ख्रिश्चन धर्मगुरुंना महागात पडले आहे. इडुक्की जिल्ह्यातील मुन्नार येथे चर्च ऑफ साऊथ इंडियाच्या (सीएसआय) १०० ख्रिश्चन धर्मगुरुंना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 80 धर्मगुरुंना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा कोणत्याही कारणाने गर्दी करण्यास केरळमध्ये मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करत 480 ख्रिश्चन धर्मगुरुंनी एकत्र येऊन मुन्नार येथील चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली होती. ही माहिती मिळताच प्रार्थनेचे आयोजन करणाऱ्या धर्मगुरुविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बिशप धर्मराज रसलम यांनी प्रार्थनेचे आयोजन केले होते. फादर बिजमोन (५२) व फादर शाईन बी. राज (४३) यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-ममता बॅनर्जींची हॅट्रिक! सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
पाच दिवस सुरू होती धर्मगुरुंची प्रार्थना
ख्रिश्चन धर्मगुरुंची प्रार्थना ही १३ एप्रिल ते १७ एप्रिलदरम्यान सुरू होती, असे सूत्राने ईटीव्ही भारतला सांगितले. प्रार्थना करता धर्मगुरुंनी मास्क घातला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नव्हते. प्रार्थनेला उपस्थित राहिलेले धर्मगुरू हे पुन्हा चर्चमध्ये येणाऱ्या भाविकांसह इतर धर्मगुरूंमध्ये मिसळले होते. त्यामुळे ख्रिश्चन भाविकांनी सीएसआय चर्च प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा-कोरोना संबंधित आरोग्य सुविधांसाठी आरबीआयकडून 50 हजार कोटींची तरतूद
परिसरात भीतीचे वातावरण
हे धर्मगुरू अनेक लोकांना भेटले असल्याने परिसरात अत्यंत चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. या धर्मगुरूंमुळे परिसरात कोरोनाचा अधिक संसर्ग पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या धर्मगुरुंविरोधात केरळच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये गतवर्षी मार्च महिन्यात पार पडलेल्या तबलिघी जमात धार्मिक कार्यक्रमात अनेकांना कोरोना झाला होता. तर यंदा महाकुंभमेळ्यातील सहभागी झालेल्या १०२ साधू व अनेक भाविकांना कोरोनाची लागण झाली आहे.