नवी दिल्ली - ग्रेटर नोएडामधील जेवर पोलीस स्टेशन परिसरातील चंचली गावात पोलिसाला ओलीस ठेवून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंचली गावात गांजा तस्करांच्या घरी पोलिसाने धाड मारली असता, तस्करांच्या कुटुंबातील सदस्यांसह आसपासच्या लोकांनी पोलिसालाच बंधक बनवलं. सरकारी कामात अडथळा आणून गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. यात दोन महिलांचा समावेश आहे.
मुख्य आरोपी बलवीर, आरोपी नीतू आणि रजनी अशी अटक केलल्यांची नावे आहेत. गांजा विक्रीच्या माहितीवरुन छापा टाकण्यात आला. छापेमारी दरम्यान कामात अडथळा आणत पोलिसांना आरोपींनी मारहाण केली. तीघांना अटक करण्यात आली असून सध्या फरार असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त विशाल पांडे सांगितले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
दिल्लीतील पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण, जुनी घटना -
यापूर्वी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण होत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. द्वारका जिल्ह्याच्या उत्तम नगर पोलीस ठाणे परिसरात एका पोलिसाला मारहाण झाली होती. सोफ्यावर बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला काही जण मारहाण करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत होते. संबंधित पोलिसावर दारू पिऊन कार्यालयात आल्याचा आरोप होता.
मुंबईत महिलेची ट्रॅफिक पोलिसाला मारहाण -
मुंबईतील एल.टी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करत असलेल्या ट्रॅफिक पोलिसला एका महिलेने बेदम मारहाण केली होती. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. एकनाथ श्रीरंग पार्टे असे वाहतूक पोलिसाचे नाव होते. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेने पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर धरून त्यास मारहाण केली होती.