प्रयागराज : उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी आता माफिया अतिक अहमदचा दुसरा मुलगा अली अहमद याच्यावर कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. उमेश पाल खून प्रकरणातील अलीच्या भूमिकेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उमेश पाल हत्याकांडात अतिक अहमद आणि अशरफ यांच्यासोबत अलीने नैनी सेंट्रल जेल आणि लखनऊ जेलमध्येही कोणती भूमिका बजावली याचा शोध पोलीस घेत आहेत.
अली अहमद आहे नैनी मध्यवर्ती कारागृहात बंद : उमेश पाल यांची हत्या 24 फेब्रुवारीला करण्यात आली होती. त्यानंतर मुलांसह अतिक, त्याची पत्नी शाइस्ता परवीन आणि भाऊ अशरफ यांची आरोपी म्हणून नावे होती तक्रारीत नमूद करण्यात आली होती. तपासानंतर या घटनेच्या कटात अतिक अहमदच्या चार मुलांची भूमिका पोलिसांना मिळून आली आहे. पुराव्याच्या आधारे अतिक अहमदच्या मुलांवरही पोलीस कारवाई करणार आहेत. सध्या अतिक अहमदचा मुलगा अली अहमद हा नैनी मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. त्याला चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्याची तयारी करत आहेत.
पोलीस कोठडीसाठी करणार न्यायालयात अर्ज : उमेश पाल खून प्रकरणात अतिक अहमदचा दुसरा मुलगा अलीला पोलीस कोठडीत घेण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली. पोलिसांकडून लवकरच कोठडी रिमांडसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार आहे. अली अहमदच्या चौकशीसाठी पोलीस सात दिवसांच्या कोठडीची मागणी करू शकतात. कोठडी मंजूर झाल्यानंतर उमेश पाल खून प्रकरणाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस त्याच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. उमेश पाल खून प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही पोलीस शोधत आहेत.
उमेश पाल यांच्यासह दोन हवालदारांची हत्या : उमेश पाल यांच्यासह दोन हवालदारांची 24 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जया पाल यांच्या तक्रारीच्या आधारे अतिक अहमद याच्या पाच मुलांपैकी चार मुलांना आरोपी करण्यात आले आहे. यातील पहिला मुलगा उमर आणि दुसरा मुलगा अली हे तुरुंगात आहेत. तर तिसरा मुलगा असद हा एसटीएफसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या दोन अल्पवयीन मुलांना बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे.
आयफोनवर आयडी करुन चालवले फेस टाईम अॅप : उमेश पाल हत्या प्रकरणात अतिक अहमद याच्या मुलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. यात अतिकच्या चौथ्या मुलावर माफिया अतिक अश्रफसह सर्व शूटर्सच्या आयफोनवर आयडी तयार करणे, त्यांना फेस टाईम अॅप चालवण्याचे प्रशिक्षण देणे, बनावट मार्गाने सिमकार्ड मिळवण्याचा आरोप आहे. अतिकच्या संपूर्ण कुटुंबावर उमेश पाल आणि दोन हवालदारांची हत्या केल्याचा आरोप आहे. तिहेरी हत्याकांडात सहभागी असलेले अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या झाली असतानाच त्यांचा मुलगा असदचाही खात्मा करण्यात आला आहे. तर अतिकच्या पत्नीवर 50 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तुरुंगात असलेल्या दोन मुलांसह अन्य दोन अल्पवयीन मुलांच्या भूमिकेशी संबंधित माहिती पोलीस गोळा करत आहेत. त्याआधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.