भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी ते केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या फायद्यांबाबत माहिती देतील. राज्य सरकारच्या एका कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २२ दिवसांपासून देशभरातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. हे कायदे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असून, ते मागे घ्यावेत अशी या आंदोलकांची मागणी आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी, केंद्रीय कृषीमंत्री तोमर आणि इतर मंत्रीही हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याचे सांगत आहेत.
किसान कल्याण कार्यक्रम..
मध्य प्रदेश सरकारने रायसेन जिल्ह्यात राज्यस्तरीय 'किसान कल्याण' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह हे १,६०० कोटी रुपयांचा मदतनिधी राज्याच्या सुमारे ३५.५० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करतील. खरीपाच्या हंगामात झालेल्या पिकांच्या नुकसानासाठी हा मदतनिधी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सुमारे २० हजार शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
हरियाणा-गुजरातमध्येही चर्चा..
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीही हरियाणातील काही शेतकऱ्यांची भेट घेत, या कायद्यांबाबत चर्चा केली होती. या सर्व शेतकऱ्यांचा केंद्राच्या कृषी कायद्यांना पाठिंबा होता. तसेच, गुजरातच्या कच्छमध्येही विविध विकासकामांच्या उद्घाटनावेळी मोदींनी शेतकऱ्यांना संबोधित करत कृषी कायद्यांचे शेतकऱ्यांना होणारे फायदे स्पष्ट केले होते.
हेही वाचा : केंद्रीय कृषी मंत्र्यांचे आंदोलक शेतकऱ्यांना पत्र, शंका दूर करण्याचे लेखी आश्वासन