नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. बंगालमध्ये मोदींच्या तब्बल २० प्रचारसभा होणार आहेत. तर, आसाममध्ये सहा प्रचारयात्रा होणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रचारयात्रांचे नियोजन विशिष्ट प्रकारे करण्यात आले आहे. पश्चिम बंगालचे सर्व २३ जिल्हे आणि आसाममधील ३३ जिल्ह्यांमधून या प्रचारयात्रा काढण्यात येणार आहेत. सर्वच ठिकाणच्या भाजपा नेत्यांकडून पंतप्रधानांच्या रॅलीची मागणी करण्यात आल्यामुळे अशा प्रकारे प्रचारयात्रा नियोजित करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सात मार्चला प्रचारसभा..
यासोबतच कोलकातामधील ब्रिगेड परेड मैदानावर सात मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभाही पार पडणार आहे. यासाठी कैलास विजयवर्गीय, मुकूल रॉय, संजय सिंह असे भाजपाचे वरिष्ठ नेते या सभेची तयारी करत आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ही मोदींची पहिलीच प्रचारयात्रा असणार आहे. तसेच, प्रचाराच्या रणनीतीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगाल भाजपाची बुधवारी बैठक पार पडणार आहे.
बंगालमध्ये आठ तर आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान..
या सभेमध्ये प्रचाराची रणनीती आणि उमेदवारांबाबत चर्चा होईल, असे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ ठप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. २७ मार्च ते २९ एप्रिलपर्यंत हे आठ टप्पे असणार आहेत. तर आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. २७ मार्च ते सहा एप्रिलपर्यंत हे टप्पे असणार आहेत. त्यानंतर २ मे रोजी या दोन्ही राज्यांमधील मतमोजणी पार पडणार आहे.
हेही वाचा : CORONA Vaccination : नरेंद्र मोदी, शरद पवारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी घेतली लस