नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 91 एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन करणार आहेत. सीमावर्ती भागात आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये एफएम रेडिओ कनेक्टिव्हिटीला यामुळे चालना मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) महत्त्वांची जिल्हे आणि सीमावर्ती भाग या एफएमच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रयत्नामुळे रेडिओ सेवा अतिरिक्त दोन कोटी नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आतापर्यंत एफएम सुविधा नसलेल्या 35 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये एफएसची व्याप्ती आणखी वाढणार आहे.
मन की बातच्या दोन दिवस आधी होणार विस्तार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्यात होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दोन दिवस आधी हा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, लडाख आणि अंदमान निकोबार बेटे अशा 84 जिल्ह्यांमध्ये 100 वॅट्सचे एकूण 91 नवीन एफएम ट्रान्समीटर बसवण्यात आल्याचेही पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी रेडिओचा उपयोग : जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी रेडिओच्या महत्त्वाच्या भूमिकेवर पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे रेडिओच्या अनोख्या शक्तीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला होता. मन की बात या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाचा 100 वा भाग रविवारी प्रसारित होणार आहे. मन की बात या कार्यक्रमाचे 100 भाग होत असल्याने भारतीय जनता पक्ष देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करणार आहे.
मन की बातचे 100 कार्यक्रम झाल्याने विशेष नाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबर 2014 रोजी मन की बात कार्यक्रम सुरू केला होता. आता मन की बात या कार्यक्रमाचे रविवारी 100 भाग होत आहेत. त्यामुळे याचे औचित्य साधत 100 रुपयांचे विशेष नाणेही यावेळी जारी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक विधानसभेत 100 कार्यक्रम आयोजित करण्याचा भाजपचा विचार आहे. यासाठी सर्व खासदार आणि आमदारांवर याबाबतची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - Jiah Khan Death Case : जिया खान आत्महत्येप्रकरणी सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता