नवी दिल्ली Narendra Modi Mann Ki Baat : देशात आता लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, परदेशात लग्न आयोजित करण्याच्या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अशा प्रकारचे उत्सव भारतातच आयोजित करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.
भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच प्राधान्य द्या : आपल्या 'मन की बात' रेडिओ संबोधनादरम्यान, मोदींनी लग्नाची तयारी करताना भारतात बनवलेल्या उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देण्याचं आवाहन केलं. "व्यापारी संघटनांच्या मते, या काळात अंदाजे ५ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विवाहसोहळ्याची खरेदी करताना केवळ भारतात बनवलेल्या उत्पादनांनाच प्राधान्य द्यावं", असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.
...तर देशाचा पैसा देशातच राहील : "एक गोष्ट मला खूप दिवसांपासून सतावत आहे. जर मी माझ्या मनातील वेदना माझ्या घरच्यांसमोर मांडली नाही, तर मी कोणाकडे करू? दिवसेंदिवस काही कुटुंबांकडून परदेशात जाऊन विवाहसोहळा पार पाडण्यासाठी वातावरण निर्माण केलं जात आहे. हे आवश्यक आहे का?" असं मोदी म्हणाले. भारतात लग्नसोहळे साजरे केले तर देशाचा पैसा देशातच राहील, यावर त्यांनी भर दिला. अशा विवाहसोहळ्यांमार्फत देशातील जनतेला काही ना काही सेवा देण्याची संधी मिळेल, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. "'व्होकल फॉर लोकल' या मोहिमेचा विस्तार तुम्ही करू शकता का? आपण आपल्याच देशात असे लग्न समारंभ का करत नाही?" असं मोदी म्हणाले.
'वोकल फॉर लोकल' वर भर : "देशात आज तुम्हाला हवी तशी सुविधा नसेल, मात्र जर आपण असे कार्यक्रम आयोजित केले, तर त्याचाही विकास होईल. हा विषय अनेक मोठ्या कुटुंबांशी निगडित आहे. मला आशा आहे की माझी ही व्यथा त्या मोठ्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल", असं पंतप्रधान म्हणाले. "गेल्या महिन्यात 'मन की बात'मध्ये मी 'वोकल फॉर लोकल' अर्थात स्थानिक उत्पादनं खरेदी करण्यावर भर दिला होता. त्यानंतर देशात दिवाळी, भाऊबीज आणि छठ दरम्यान ४ लाख कोटी रुपयांहून अधिकचा व्यवसाय झाला", असं ते म्हणाले.
हेही वाचा :