अहमदाबाद : गुजरात दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. राजकोट शहराजवळ हिरासर गावातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे गुरुवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती गुजरात सरकारकडून देण्यात आली आहे. राजकोट हे गुजरातचे पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकोट शहरातील रेसकोर्स मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत.
सौनी प्रकल्पाचे करणार लोकार्पण : मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात गुजरात सरकारने सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना ( SAUNI ) पॅकेज 8 आणि 9 च्या लिंक 3 चे बांधकाम पूर्ण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हा प्रकल्प सौराष्ट्रातील जनतेला समर्पित करणार आहेत. या योजनेमुळे 95 गावांमधील 52 हजार 398 एकर जमिनीला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासह सौराष्ट्रातील सुमारे 98 हजार नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
सेमिकॉन इंडिया प्रकल्पाचे उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्याने बांधलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटनही करणार आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गांधीनगरमध्ये 'सेमिकॉन इंडिया 2023' प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये सेमीकंडक्टरशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
काय आहे सौनी प्रकल्प : गुजरात सरकारने पाणी पुरवठा करण्यासाठी सौनी प्रकल्पाचे बांधकाम केले आहे. या प्रकल्पातील लिंक 3 च्या पॅकेज 8 अंतर्गत 265 कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प केला आहे. यात भादर-1 आणि वेरी धरणापर्यंत 32.56 किमी लांबीची 2500 मिमी व्यासाची पाइपलाइनची फीडर एक्स्टेंशन लाईन टाकण्यात आली आहे. यामुळे 57 गावातील 75 हजारांहून अधिक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे शक्य होणार आहे. सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन योजना (SAUNI) हा सौराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आणि जीवनदायी प्रकल्प आहे. या अंतर्गत नर्मदा नदीत येणारे अतिरिक्त 43 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी सौराष्ट्रातील 115 विद्यमान जलाशयांमध्ये भरण्याची योजना आहे.
हेही वाचा -