नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'हरियाणा क्षेत्रीय पंचायती राज परिषदे'चे उद्घाटन केले. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही हजारो गावांमध्ये विजेसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला जबाबदार धरले. खेडोपाडी पंचायत राज व्यवस्था लागू करणे किती महत्त्वाचे आहे, हे स्वातंत्र्यानंतरच्या चार दशकांत देखील समजू शकले नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर ताशेरे ओढले. विकास आणि प्रगतीच्या कोणत्याही क्षेत्रात मोठे बदल घडवून आणण्यासाठी जिल्हा पंचायतींमध्ये अफाट शक्ती आहे, असेदेखील ते म्हणाले.
काँग्रेसवर घणाघाती हल्ला : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे भाजपच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर, पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात पंचायती राज संस्थांना मजबूत करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले गेले नाहीत. काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसच्या भ्रष्ट हेतूमुळे स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही 18,000 गावकऱ्यांना वीज पोहोचली नाही. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि ‘अमृत काल’चे संकल्प पूर्ण करण्यासाठी आज देश एकजुटीने पुढे जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
अनुभव लक्षात ठेवावे लागतील : मोदी म्हणाले की, या 'अमृत काल'च्या 25 वर्षांच्या प्रवासात आपल्याला गेल्या दशकांतील अनुभव लक्षात ठेवावे लागतील. विकसित भारताचा रस्ता टियर 2 आणि टियर 3 शहरांमधून तसेच आधुनिक होत असलेल्या खेड्यांमधून जातो. एक नवीन आशा, ऊर्जा अंतराळात आणि लहान शहरांमध्ये दिसत आहे. फरीदाबादच्या सूरजकुंडमध्ये झालेल्या या कार्यक्रमात भाजपाचे प्रमुख जे पी नड्डा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, भाजपाचे नेते ओ पी धनखर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.
रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 6 ऑगस्ट रोजी एकाचवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 24,470 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. अमृत भारत स्टेशन योजना देशभरातील 1309 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी राबविण्यात येत आहे.
हेही वाचा :