वाराणसी PM Modi to inaugurate Eastern Dedicated Freight Corridor : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. आज दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्राधान मोदी ईस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरच्या नवीन दीनदयाल उपाध्याय जंक्शन ते नवीन भाऊपूर जंक्शन पर्यंत 402 किमी लांबीचा रेल्वे मार्ग देशाला समर्पित करणार आहेत.
- नवीन दीनदयाळ उपाध्याय जंक्शन ते नवीन भाऊपूर जंक्शन विभागाचं उद्घाटन हा ईस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे. तब्बल 10 हजार 903 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा विभाग दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर स्थित आहे. हा कॉरिडॉर उत्तर प्रदेशातील चंदौली, मिर्झापूर, प्रयागराज, कौशांबी, फतेहपूर, कानपूर नगर आणि कानपूर देहत या जिल्ह्यांमधून जातो.
मालवाहतूकीला बळ मिळेल : या मार्गावर सहा जंक्शन स्टेशन आणि सहा क्रॉसिंग स्टेशन्ससह एकूण 12 स्टेशन्सचा समावेश आहे. हा कॉरिडॉर झारखंड आणि पश्चिम बंगालच्या कोळसा क्षेत्रांना जोडतो. इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड, भारत कोकिंग कोल लिमिटेड आणि नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, आदी प्रकल्पांना हा मार्ग जोडतो. या कॉरिडॉरवर 100 किमी/ताशी वेगानं मालवाहू गाड्या धावत असल्यानं, वीज प्रकल्पांना कोळशाचा जलद पुरवठा केल्यानं खर्च आणि वेळ कमी झाला आहे. याव्यतिरिक्त, लोखंड आणि स्टीलसह जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक अधिक कार्यक्षम झालीय.
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील : कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यामुळं दिल्ली-हावडा मुख्य मार्गावरील वाहतूकीचा ताण तर कमी झाला आहे. परंतु मालवाहतूक कॉरिडॉरवरील गाड्या जलद आणि सुरळीत चालण्यासही मदत झालीय. यामुळं दिल्ली-हावडा मुख्य मार्गावर अतिरिक्त प्रवासी रेल्वे सेवा सुरू करण्यास परवानगी मिळालीय. न्यू कानपूर जंक्शनच्या आजूबाजूला मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क विकसित केले जाणार आहेत. त्यातून कार्यक्षम कार्गो वाहतूक सुविधा प्रदान होणार आहे. तसंच परिसरात नवीन रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
वाराणसीकरांना दुसरी वंदे भारत रेल्वे भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीला दुसरी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे भेट देणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी वाराणसी ते दिल्ली धावणाऱ्या दुसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. याचा फायदा वाराणसीहून दिल्लीला जाणाऱ्या लाखो प्रवाशांना होणार आहे. पंतप्रधान मोदी आज वाराणसीमध्ये दुपारी 2:15 वाजता अधिकृतपणे झेंडा दाखवून या रेल्वेसेवेचा शुभारंभ करतील.
हेही वाचा :