नवी दिल्ली : आज देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ९६वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेमध्ये 'अटल बिहारी वाजपेयी' या पुस्तकाचे प्रकाशन करतील.
सुशासन दिन..
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशात सुशासन दिन साजरा केला जातो. वाजपेयी यांच्या कार्यासाठी २०१४ साली या दिनाची घोषणा करण्यात आली होती. आज पंतप्रधान मोदी हे वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील.
अटल बिहारी वाजपेयी..
अटल बिहारी वाजपेयी हे पुस्तक लोकसभा सचिवालयामार्फत प्रकाशित करण्यात येत आहे. यामध्ये वाजपेयी यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि संसदेतील त्यांच्या काही विशेष भाषणांचा समावेश आहे. यासोबतच, या पुस्तकात वाजपेयी यांची काही दुर्मिळ छायाचित्रेही प्रकाशित करण्यात आली आहेत.
प्रखर वक्ते..
भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले अटल बिहारी वाजपेयी केवळ एक प्रखर वक्ताच नव्हते तर एक शानदार कवी सुद्धा होते. संसदेमधील त्यांची भाषणे आजही प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान असताना त्यांनी देशाची अर्थव्यवस्था वर नेण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली होती. वाजपेयींनीच निर्माण केलेला सुवर्ण चतुष्कोण हा भारतातील सर्वात मोठा तर जगातील पाचव्या क्रमांकाचा महामार्ग प्रकल्प आज देशाला जोडून ठेवत आहे.
1996 मध्ये वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, त्यांचे सरकार त्यावेळी 13 दिवसच टिकले होते. तर पुन्हा 1998 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळीही त्यांचे सरकार 13 महिनेच होते. 1999 मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळी त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशामधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले. वाजपेयी यांना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
हेही वाचा : राहुल गांधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; केंद्राने कृषी कायदे मागे घ्यावे...