नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आज वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारी संवाद साधून ते आपल्या मतदारसंघातील कोविड आणि नॉन-कोविड रुग्णालयांचा आढावा घेतील.
पंतप्रधानांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिली. वाराणसी या आपल्या मतदारसंघातील कोरोना रुग्णालयांचे कामकाज कसे सुरू आहे, याबाबत मोदी माहिती घेतील. यामधील विशेष म्हणजे, डीआरडीओ आणि लष्कराकडून उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा ते घेणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच, ते जिल्ह्यातील नॉन-कोविड रुग्णालयांच्या कामकाजाबाबतही माहिती घेतील, असेही कार्यालयाकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी कालच (गुरुवारी) दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन, तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी या सर्व राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा केली होती. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश होता.
हेही वाचा : पीएम केअरमधून मिळालेल्या ४१२७ व्हेंटिलेटरपैकी केवळ ३३२ व्हेंटिलेटर नादुरुस्त - राजेश टोपे