नवी दिल्ली - देशातील पहिली चालकरहित मेट्रो दिल्लीत धावणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मॅजेंटा लाईन (मार्ग) म्हणजेच जनकपूरी ते वेस्ट बॉटॅनिकल गार्डन दरम्यान ही मेट्रो सोमवारी (२८ डिसेंबर) धावणार आहे. हिरवा झेंडा दाखवून मोंदीच्या हस्ते मेट्रो मार्गक्रमण करणार आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार उद्धाटन -
सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित कार्यक्रमात ह्या ऑटोमेटेड मेट्रोचे उद्धाटन करणार आहेत. सुरुवातील ३७ किमी लांबीच्या मॅजेंटा लाईनवर ही मेट्रो धावणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील सर्व मार्गांवर चालकरहित मेट्रो धावणार आहे. मॅजेंटा मार्गानंतर पिंक मार्गावर मेट्रो चालकाशिवाय धावणार आहे.
कम्युनिकेशन बेस्ड कंट्रोल सिस्टिम -
दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा आणि पिंक मार्गाची निर्मिती करण्यात आली तेव्हापासून चालकविरहीत मेट्रो धावण्याची सुविधा निर्माण करण्यात आली होती. या मार्गांवर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टम उभारण्यात आली आहे. मात्र, आत्तापर्यंत या मार्गांवर चालकद्वारेच मेट्रो ऑपरेट करण्यात येत होती. मात्र, दिल्ली मेट्रो प्रशासनाने आता तिसऱ्या टप्प्यात चालकविरहित मेट्रो चालविण्याची परवानगी मंत्रालयाकडून मिळवली आहे. परवानगी मिळाल्यानंतर सर्वात प्रथम मॅजेंटा लाईनवर मेट्रो धावणार आहे. मोदी हिरवा झेंडा दाखवून व्हर्च्युअली या मेट्रोचे उद्धाटन करणार आहेत.
कशी चालते विना चालक मेट्रो ?
विनाचालक मेट्रो चालविण्यासाठी इंटरनेट वायफायची गरज पडते. मेट्रोमध्ये एक रिसिव्हर बसवलेला असतो. या रिसिव्हरला कंट्रोल रुममधून सिग्नल पाठविण्यात येतात. त्या सिग्नलनुसार मेट्रो चालकाशिवाय मार्गक्रमण करते. परदेशात विनाचालक मेट्रो आधीपासूनच सुरू आहे. हे तंत्रज्ञान सुरक्षित असून जर चुकून दोन मेट्रो एकाच ट्रॅकवर आल्यातर काही ठराविक अंतर सोडून आपोआप मेट्रो थांबते.