नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यामध्ये आज व्हर्चुअल परिषद पार पडणार आहे. या परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रांमधील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी पुढील दहा वर्षांसाठीच्या विविध योजनांबाबत ते चर्चा करतील.
रोडमॅप २०३० होणार लॉंच..
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. बहुपक्षीय धोरणात्मक संबंधांना उन्नत करण्याची आणि परस्पर स्वारस्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर सहकार्य वाढविण्याची ही एक महत्त्वाची संधी असेल, असे मंत्रालय याबाबत म्हणाले. या परिषदेमध्ये जाहीर होणारा 'रोडमॅप २०३०' पाच मुद्द्यांवर आधारित असेल असेही मंत्रालयाने स्पष्ट केले.
या रोडमॅपमधील पाच मुद्दे पुढीलप्रमाणे - लोक परस्पर संबंध, व्यापार आणि समृद्धी, सुरक्षा, पर्यावरण आणि आरोग्य व्यवस्था.
जॉन्सन हे या परिषदेसाठी गेल्या महिन्यात भारतात येणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यापूर्वी २६ जानेवारीलाही जॉन्सन भारतात येणार होते, मात्र कोरोनामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता.
हेही वाचा : बिल आणि मेलिंडा गेट्स घेणार घटस्फोट; २७ वर्षांचा होता संसार