नवी दिल्ली : पूर्व किनाऱ्यावर तौक्ते वादळाने तडाखा दिल्यानंतर देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर यश चक्रीवादळाचा धोका उभा ठाकला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालला २४ ते २६ तारखेच्या दरम्यान हे वादळ येऊन धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदी आज आढावा बैठक घेणार आहेत.
सकाळी ११ वाजता ही बैठक पार पडेल. यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी; तसेच दूरसंचार, उर्जा, नागरी उड्डाण आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयांचे सचिवही या बैठकीला उपस्थित राहतील. हे सर्व यश वादळाला तोंड देण्यासाठी आपण काय तयारी केली आहे याबाबत पंतप्रधानांना माहिती देतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मंत्रिमंडळाती इतर काही नेतेही या बैठकीला उपस्थित असतील.
भारतीय लष्कराने शनिवारी सांगितले, की ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आपण विशेष पथके तैनात केली आहेत. बचावकार्य आणि पुनर्वसनासाठी ही पथके लोकांना मदत करतील. तसेच, उत्तर रेल्वेनेही खबरदारी म्हणून दिल्ली ते भुवनेश्वर आणि पुरीला मार्गावरील कित्येक गाड्या रद्द केल्या आहेत. पश्चिम किनाऱ्यावर तैनात असलेले भारतीय तटरक्षक दलाचे जवानही या वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी यापूर्वीच संबंधित विभागांच्या आढावा बैठकी घेत वादळासाठीच्या तयारीची पाहणी केली आहे.
हेही वाचा : केरळ : विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसकडून व्ही.डी. सतीशन यांची निवड