नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून कोरोनाच उद्रेक होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या राज्यपालांची बैठक बोलावली. या बैठकीला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूदेखील उपस्थित होते.
कोरोना महामारीविरोधातील लढाईत राज्यपालांच्या भूमिकेवर पंतप्रधानांनी त्यांच्याशी चर्चा केली. कोरोना युद्धात राज्य सरकारांशी जवळून काम करण्याचा सल्ला दिला. कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी सर्व समुदाय संस्था, राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांची एकत्रित शक्ती वापरण्याची गरज आहे, असे मोदी बैठकीत म्हणाले. तसेच सरकार लसांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. लसीकरण आणि उपचारांबाबतचा संदेश देण्याबरोबरच राज्यपाल आयुष संबंधित उपाययोजनांबाबत जनजागृती देखील करू शकतात, असे मोदी म्हणाले.
जागतिक महामारी विरोधात लढण्यासाठी चाचण्या, देखरेख आणि उपचारांची रणनीती राबविणे आवश्यक आहे. राज्यपालांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कार्य करावे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी एक संघ म्हणून एकत्र काम करा, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बैठकीत म्हणाले.
कोरोनासंदर्भातील राज्यपाल आणि उपराष्ट्रपतींची ही पहिली अधिकृत बैठक होती. संविधानानुसार पंतप्रधान राज्यपालांची बैठक बोलवू शकत नाहीत. हे कार्य फक्त राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती करू शकतात.
मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक -
यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी 8 एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारी सध्यस्थितीची माहिती आणि लसीकरण मोहिमेचाही आढावा घेतला. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाचण्याचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. महाराष्ट्र , छत्तीसगड, पंजाब, मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांनी कोरोनाची पहिली लाट पार केली आहे. इतर राज्यातही कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. हा एक चिंतेचा विषय आहे, असे मोदी म्हणाले होते.
लसीकरण वेगाने सुरू-
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात आहे. रुग्ण संख्या वाढत चालल्याने लसीची मागणी वाढत आहे. तुटवडा निर्माण झाल्याने अनेक लसीकरण केंद्रावरील लस देण्याची मोहीम ठप्प झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारने स्पुतनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
हेही वाचा - इतर राज्यातून येणाऱ्या यात्रेकरूंनी आयसोलेशनमध्ये राहावे; तिरुपती नगरपालिका आयुक्तांचे आवाहन