नवी दिल्ली - 'कोविडविरुद्धच्या लढाईदरम्यान भारताने दीडशेहून अधिक देशांना औषधे आणि आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. तर, आतापर्यंत भारताने कोविडवरील मेड-इन-इंडिया लस 50 देशांना उपलब्ध करून दिली आहे,' अशी माहिती भारत-स्वीडन आभासी (व्हर्च्युअल) शिखर परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी दिली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'कोविड-19 दरम्यान आम्ही प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर सहकार्याचे महत्त्व ओळखले आहे. कोविड-19 साथीविरुद्धच्या लढाईत जगाला आवश्यक पाठबळ देण्यासाठी भारताने 150 हून अधिक देशांना औषधे आणि अन्य अत्यावश्यक साधने पुरवली आहेत. तसेच आम्ही आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिका येथील फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी आणि धोरणकर्त्यांसह आमचे अनुभव ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे सामायिक केले.'
हेही वाचा - भारतीय बनावटीची कोविड लस सोमालियाला रवाना
'आम्ही आत्तापर्यंत सुमारे 50 देशांना मेड इन इंडिया कोविड लस पुरवली आहे. येत्या काही दिवसांत आणखी बऱ्याच देशांना ही लस पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पर्यावरणीय बदलाचा महत्त्वाचा मुद्दा आम्हा दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमावर आहे. आम्ही यावर आपल्याबरोबर काम करू इच्छितो. पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाच्या अनुषंगाने जगण्याला भारतीय संस्कृतीत नेहमीच महत्त्व दिले जात आले आहे.
हेही वाचा - 'राहुल गांधींनाच समज कमी, त्यांनी अमेठीच्या जनतेचा केला अपमान'