नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय राजधानीत पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. ही परिषद आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर प्रगती मैदानावर आहे. पंतप्रधान आज सकाळी 10:30 वाजता परिषदेचे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
नागरी सेवेच्या क्षमता वाढविणे, प्रशासन प्रक्रियेत बदल करणे आणि धोरण अंमलबजावणी सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. मार्गदर्शन करून, योग्य वृत्ती, कौशल्ये आणि भविष्यासाठी सज्ज असलेली नागरी सेवा तयार करण्यासाठी राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता विकास कार्यक्रम (NPCSCB) - 'मिशन कर्मयोगी' सुरू करण्यात आला. त्यादृष्टीने ही परिषद महत्त्वाचे पाऊल असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
1500 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार: या परिषदेत केंद्रीय प्रशिक्षण संस्था, राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, प्रादेशिक आणि क्षेत्रीय प्रशिक्षण संस्था आणि संशोधन संस्थांसह प्रशिक्षण संस्थांचे 1500 हून अधिक प्रतिनिधी संमेलनात सहभागी होणार आहेत. नागरी सेवाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारचे विभाग, राज्य सरकारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरी सेवक तसेच खासगी क्षेत्रातील तज्ञ या चर्चेत भाग घेणार आहेत.
आठ-पॅनलची चर्चा होणार : विविध विचारांच्या देवाणघेवाणीला चालना देण्यासाठी ही परिषद उपयुक्त असेल, असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. भविष्यात भेडसावणारी आव्हाने आणि उपलब्ध संधी ओळखता येणार आहेत. क्षमता वाढीसाठी कृती करण्यासाठी उपाय आणि सर्वसमावेशक धोरणे निर्माण करणे शक्य होणार आहे. या परिषदेमध्ये आठ-पॅनलची चर्चा होणार आहे. त्यातील प्रत्येक नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
काय आहे भारतीय नागरी सेवेचे स्वरूप: भारतीय नागरी सेवेतील अधिकारी प्रशासकीय व्यवस्था संभाळत योजनांची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे काम करतात. भारतीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना देशात महत्वाचे स्थान आहे, भारतीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची निवड करण्यात येते. भारतीय नागरी सेवा गट अ आणि भारतीय नागरी सेवा गट ब अशा दोन स्वरूपात भारतीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची निवड होते. यात भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वनसेवा असे विविध विभागात आहेत. यात भारतीय नागरी सेवेत गट अ व गट ब या विभागात तब्बल 17 सेवांचा समावेश आहे.
हेही वाचा-