नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीला आता एक महिना उरला आहे. कर्नाटकात १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज रविवार बैठक झाली. संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर सीईसी सदस्यांसह मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या बैठकीला उपस्थित होते.
तर अंतिम यादीत मोठे बदल : सीईसी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी, संभाव्य नावे निवडण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी गेल्या काही दिवसांत बैठका घेतल्या. कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने 224 पैकी किमान 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधी पक्ष काँग्रेसनेही कर्नाटकात पुन्हा सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी सीईसीची बैठक झाली. परंतु, काही राजकीय समिकरणे बदलले तर अंतिम यादीत मोठे बदल होऊ शकतात.
उद्या किंवा परवा यादी जाहीर केली जाईल : जास्तीत जास्त उमेदवारांच्या नावांची यादी सोमवारी जाहीर केली जाऊ शकते. त्याच सीईसी बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, आम्ही कर्नाटक निवडणुकीच्या एकूण यादीवर चर्चा केली आणि कदाचित आम्ही उद्या पुन्हा बसू आणि उद्या किंवा परवा यादी जाहीर केली जाईल. ते म्हणाले की, तसेच, मी माझ्याच म्हणजे शिगाव मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
104 जागा जिंकून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला: याआधी शनिवारी शहा यांनी नड्डा यांच्या निवासस्थानी 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर चर्चा आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी बैठक घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 104 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. तर, काँग्रेसने 80 आणि JD(S) 37 जागा जिंकल्या होत्या. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. सध्याच्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपणार आहे.
हेही वाचा : बाळासाहेब ठाकरेंचे राममंदिराचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे