जयपूर : राजस्थानच्या जैसलमेरमधील जवानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शनिवारी) दिवाळी साजरी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, की देशाच्या सीमांवर सैनिक आहेत, त्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. देशात सण-उत्सव साजरे होऊ शकत आहेत. आज मी केवळ माझ्यातर्फेच नव्हे, तर देशातील सर्व नागरिकांतर्फे तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहोत, असे ते यावेळी जवानांना म्हणाले.
सैनिकांमध्ये आल्यावरच माझी दिवाळी साजरी होते
यावेळी बोलताना मोदी जवानांना म्हणाले, की तुम्ही देशातील बर्फाळ पर्वतरांगांमध्ये असा, वा उष्ण वाळवंटांमध्ये असा; तुमच्यामध्ये आल्यावरच माझी दिवाळी पूर्ण झाल्याचे समाधान मला मिळते. तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझा आनंद द्विगुणित होतो, असेही ते यावेळी म्हणाले.
लोंगेवाला पोस्टची इतिहासात नोंद..
देशातील प्रत्येक नागरिकाला लोंगेवाला पोस्टच्या इतिहासाबाबत माहिती आहे. अनेक पिढ्या त्यांची शौर्यगाथा लक्षात ठेऊन आहेत. त्यांची ही गाथा ऐकून आजही देशवासियांना स्फुरण चढते, असे मोदी यावेळी म्हणाले.
विस्तारवाद हा मानसिक आजार..
विस्तारवादी विचारसरणीमुळे आज संपूर्ण जगाला त्रास होतो आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजारच आहे. विस्तारवाद ही १८व्या शतकातील विचारसरणी आहे, आणि आपण सध्या २१व्या शतकात आहोत. भारत देश हा या विचारसरणीविरोधात मजबूतीने उभा आहे, असे मोदी म्हणाले.
संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर..
देशाचे संरक्षण क्षेत्र अधिकाधिक मजबूत आणि आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. देशामध्येच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. तसेच, देशातील १३० कोटी जनताही 'व्होकल फॉर लोकल' होत देशाला आत्मनिर्भर करत आहे, असे ते म्हणाले.
देश समजूतदारपणा दाखवत आहे, पण म्हणजे कमजोर नाही..
सध्या भारताची परराष्ट्र नीती ही स्पष्ट आहे. स्वतः समजूतदारपणे राहून, इतरांकडून समजूतदारपणाची अपेक्षा ठेवण्याकडे आपला कल आहे. मात्र, आमची परीक्षा पाहण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याला नक्कीच आम्ही त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा मोदींनी यावेळी दिला.
देशातील जनता तुमच्यासोबत..
देशातील १३० कोटी जनता तुमच्यासोबत आहे, असे मोदी यावेळी जवानांना म्हणाले. तुम्ही आहात म्हणून देशातील जनता सण-उत्सव साजरे करत आहे. देशातील नागरिकांना तुमचा सार्थ अभिनान आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी जोपर्यंत तुमच्यासारखे शूर जवान आहेत, तोपर्यंत कोणतीही परकीय शक्ती आपल्या देशाचे नुकसान करु शकणार नाही असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
1971 च्या युद्धातील अदम्य धाडसाचे प्रतीक -
यानंतर नरेंद्र मोदी 1971 च्या युद्धातील अदम्य धाडसाचे प्रतीक मानल्या जाणार्या लोंगेवाला पोस्ट येथे जातील. त्याठिकाणी रात्री 9 वाजता ते बीएसएफ जवानांसह दिवाळी साजरी करतील. तसेच सैनिकांना प्रोत्साहित करतील. महत्त्वाचे म्हणजे, 1971 च्या लोंगेवाला चौकी येथे भारत-पाक युद्धाच्या वेळी कुलदीपसिंग चांदपुरी यांच्या नेतृत्वात 120 भारतीय सैनिकांनी सामर्थ्य दाखवले होते. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या संपूर्ण इन्फंट्री ब्रिगेड आणि टी-59 रेजीमेंटला धूळ चारली होती.
हेही वाचा : 'ममता बॅनर्जींच्या नेतृत्वात स्वतंत्र आणि निष्पक्ष विधानसभा निवडणूक होणार नाही'