अयोध्या PM Modi Ayodhya Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी रामनगरी अयोध्येत येणार आहेत. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अयोध्या आणि आसपासच्या शहरांसाठी कोट्यवधींच्या योजना आणि प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या भव्य स्वागताची तयारीही करण्यात आली आहे. बनारसच्या डमरु दलाचे सदस्य आणि मथुराचे लोक कलाकार सादरीकरणाद्वारे पंतप्रधान मोदींचं स्वागत करतील. तसंच 40 सांस्कृतिक मंचांवरुन पंतप्रधानांचं स्वागत होणार आहे.
पंतप्रधानांचं खास स्वागत : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जात आहेत. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचं स्वागत करण्यासाठी काशीहून खास डमरु टीमही दाखल झालीय. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत अयोध्येतील प्रसिद्ध शंख वादक वैभव मिश्रा करणार आहेत. तर मोहित चौरसिया वाराणसीहून म्हणजेच बाबा विश्वनाथ यांच्या आवडत्या डमरु दलासह रामाच्या भूमीत दाखल झाले आहेत. मोहित चौरसिया यांनी वाराणसीमध्ये अनेकदा पंतप्रधान मोदींचं स्वागत केलंय. विश्वनाथ धामच्या उद्घाटनाच्या वेळीही मोहित चौरसिया यांच्या डमरु दलानं पंतप्रधान मोदींचं भव्य स्वागत केलं होतं.
40 सांस्कृतिक मंच सज्ज : रामनगरी अयोध्येत पंतप्रधानांच्या भव्य स्वागताची तयारी सुरू आहे. रोड शो दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी 40 सांस्कृतिक मंच उभारण्यात आले आहेत. यावर देशातील विविध राज्यातील लोककलावंत आपले कार्यक्रम सादर करतील. यातील 26 सांस्कृतिक मंच धर्मपथावर उभारण्यात आले आहेत. तर रामपथवर पाच सांस्कृतिक मंच उभारण्यात आले असून टेढी बाजार चौक ते रेल्वे स्थानकादरम्यान पाच सांस्कृतिक प्लॅटफॉर्म उभारण्यात आले आहेत. विमानतळाच्या गेट क्रमांक 3 वर मोठा मंच उभारण्यात आलाय. विमानतळ ते साकेत पेट्रोल पंप दरम्यान पाच मंच उभारण्यात आले आहेत.
कोट्यवधींच्या योजनांचं करणार उद्घाटन : अयोध्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत. यात पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समावेश आहे. तसंच पंतप्रधान यावेळी दोन नवीन अमृत भारत रेल्वे आणि सहा वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. यासह इतर अनेक रेल्वे प्रकल्पही देशाला समर्पित करणार आहेत. यानंतर पंतप्रधान दुपारी 1 वाजता एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. या कार्यक्रमात ते राज्यातील 15 हजार 700 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यात अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या विकासासाठी सुमारे 11,100 कोटी रुपयांचे प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे 4,600 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे.
हेही वाचा :