नवी दिल्ली - आज 7वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानिमित्ताने देशाला संबोधित केले. जेव्हा संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत आहे, तेव्हा योग हा आशेचा किरण म्हणून सिद्ध झाला. दोन वर्षांपासून जगभरात आणि भारतात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले गेले नसले, तरी योग दिनाबद्दलचा उत्साह कमी झालेला नाही, असे मोदी आपल्या संबोधनात म्हणाले. कोरोना विषाणूचा जगात प्रसार झाला. तेव्हा कोणताही देश कोरोनाचा सामना करण्यासाठी ताकदीने आणि मानसिकदृष्ट्या तयार नव्हता. कठीण काळात योग हे आत्मविश्वासाचे एक उत्तम माध्यम बनले. कोरोना संकटात योग सहजतेने लोकांना विसरता आला असता, पण उलट लोकांचे यावरचे प्रेम वाढले आहे, असे कोरोना महामारीचा संदर्भ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले
आज योग दिनी प्रत्येक देश, प्रत्येक समाज आणि प्रत्येक व्यक्ती निरोगी रहावी, अशी माझी इच्छा आहे. आरोग्य म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ नाही. म्हणूनच भारतातील ऋषि मुनींनी शारीरिक आरोग्याबरोबरच योगामध्ये मानसिक आरोग्यावरही खूप भर दिला. योग आपल्याला ताणतणाव आणि नकारात्मकतेपासून मार्ग दाखवतो, असे मोदी म्हणाले. महान तमिळ संत श्री तिरुवल्लुवर म्हणाले होते, की आजार असेल तर त्याच्या मुळाशी जा, रोगाचे कारण काय आहे ते शोधा, मग त्याचा उपचार सुरू करा. योग हाच मार्ग दाखवतो, असेही मोदी म्हणाले.
योगा अॅप -
भारताने संयुक्त राष्ट्रात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडला, तेव्हा योगाचे हे शास्त्र संपूर्ण जगाला उपलब्ध व्हावे, ही भावना त्यामागे होती. या दिशेने भारताने संयुक्त राष्ट्र, डब्ल्यूएचओ यांच्यासह आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जगाला एम-योग (M-Yoga ) अॅपची शक्ती मिळणार आहे. या अॅपमध्ये, योगाच्या प्रशिक्षणाचे अनेक व्हिडिओ जगातील विविध भाषांमध्ये उपलब्ध असतील.
योग फॉर वेलनेस...
यावर्षी आपण सातवा योग दिवस साजरा करत आहोत. दरवर्षी योग दिनासाठी एक विशेष विषय (थीम) नेमण्यात येतो. यावर्षीच्या योग दिनाचा विषय आहे, 'योग फॉर वेलनेस'. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा विषय निवडण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर जगभर आहे. वैद्यकीय तज्ञ, सरकार, योगगुरू आणि आयुर्वेद या सर्वांनी या काळात सुरक्षित राहण्यासाठी योग करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोनाच्या संकटात योगासने व प्राणायाम हे योगाचे प्रकार अत्यंत प्रभावी कामगिरी बजावतात.
हेही वाचा - आंतरराष्ट्रीय योग दिन : असे असणार कार्यक्रमाचे स्वरुप
हेही वाचा -International Yoga Day 2021 : जाणून घ्या 21 जूनलाच का साजरा केला जातो योग दिवस!