डेहराडून: पिथौरागढ सीमावर्ती जिल्ह्यातील नाचनी पोलीस स्टेशन हद्दीतील होकरा येथे कारचा भीषण अपघात झाला. येथे कार दरीत कोसळल्याने किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. कार दरीत कोसळल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलीस आणि एसडीआरएफची टीम अपघातस्थळी रवाना झाली आहे.
पिथौरागढमध्ये कार दरीत कोसळली: कारमध्ये किती लोक होते, याची माहिती कळू शकली नाही. या अपघातात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व प्रवासी बागेश्वर येथील रहिवासी आहेत. ते मंदिरात दर्शनासाठी जात होते. घटनास्थळी बचाव पथक रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बोलेरो कार दरीत कोसळल्याचे बोलले जात आहे. कुमाऊंचे पोलीस महासंचालक नीलेश आनंद भरणे यांनी सांगितले की, पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतरच मृत्यूचा नेमका आकडा समजू शकणार आहे.
लोक पूजेसाठी जात होते : प्रवासी हे मंदिरात पूजेसाठी जात होते. रस्त्यावरील धुक्यामुळे कारचा ताबा सुटला. यादरम्यान हा अपघात झाला. कार सुमारे 600 मीटर खोल दरीत कोसळल्यानंतर एकच धांदल उडाली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी बचावासाठी धाव घेतली. कारमधील प्रवाशांचे मृतदेह सर्वत्र पडलेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात कारचे खूप नुकसान झाले आहे.
पिथौरागढ जिल्हा अपघातांसाठी संवेदनशील: उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्हा अपघातांसाठी संवेदनशील जिल्हा म्हणजे अपघाताचे अधिक प्रमाण आहे. हा डोंगराळ जिल्हा भूकंपाच्या दृष्टीकोनातून झोन पाचमध्ये येतो. या जिल्ह्यातील रस्ते तीव्र वळणदार व अरुंद आहेत. रस्त्याच्या खाली खोल दरी असल्याने अपघाताची शक्यता अधिक असते. रस्त्यात दरी अशा ठिकाणी आहे, की एखाद्या निर्जन ठिकाणी अपघात झाला तर अनेक दिवस लोकांना कळतही नाही. नाचणी परिसरात झालेल्या अपघाताची माहिती लोकांना मिळाल्याने वेळीच बचावकार्य सुरू करण्यात आले. बचावकार्य पूर्ण केल्यानंतरच मृतांचा नेमका आकडा सांगू, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे.