पालघर : "महायुती सरकारच्या काळात विकासकामे झाली नाहीत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून येताना लोकांना गचके बसतात. आता लोकच या सरकारला २३ तारखेला असा धडा शिकवतील, की त्यांना तो शेवटचा गचका बसेल," अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर केली. "गुजरातचे ९० हजार कार्यकर्ते महाराष्ट्रात आणून बसवले आहेत. ते आपल्यावर लक्ष ठेवणार असून मराठी माणूस मेला का, त्यांची लाचारी का स्वीकारायची?" असा सवाल ठाकरे यांनी केला. मोदी यांच्या बॅगेत नुसत्या थापा असतात, अशी टीका त्यांनी केली.
ठाकरेंचा जोरदार प्रचार : पालघर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून त्यांना शेलकी विशेषणे बहाल केली. शिवसेनेचे उपनेते उदय बंधू पाटील, मिलिंद वैद्य, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, महिला संपर्क प्रमुख ममता चेंबूरकर, उत्तम पिंपळे, माजी संपर्क प्रमुख केतन पाटील, संपर्क प्रमुख गिरीश राऊत, जिल्हा प्रमुख अजय ठाकूर, सत्यम ठाकूर, कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष ब्रायन लोबो, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
मशाल पेटली नाही, तर वाढवणचा वरंवटा फिरणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कोल्हापूर येथील मुन्ना महाडिक यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली. स्थानिक, राष्ट्रीय आणि राज्याच्या प्रश्नावर लक्ष वेधताना त्यांनी यावेळी "महाविकास आघाडीचे सरकार निवडून दिले नाही, तर मात्र बंदराचा वरवंटा तुमच्यावर फिरल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा दिला. चिंतामणराव वनगा यांच्याशी असलेल्या संबंधाचा उल्लेख करून ते म्हणाले की, "गेल्या वेळी आपण पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडूनही आणले; परंतु आता त्यांचा वापर करून कसे फेकून दिले, हे पाहिले." शिंदे यांचा उल्लेख त्यांनी मिंधे, गद्दार असा केला.
महाविकास आघाडीत महिलांचा सन्मान आणि धनही! : लाडक्या बहीण योजनेचा उल्लेख करून दीड हजार रुपयांमध्ये घर चालते का, असा सवाल करताना महाविकास आघाडीचे सरकार आले, तर महिलांचा सन्मान, त्यांचा आदर, त्यांची सुरक्षितता या गोष्टीबरोबरच त्यांना तीन हजार रुपये देण्याची घोषणा ठाकरे यांनी केली. त्याचबरोबर मुलांचे शिक्षण मुलींप्रमाणेच मोफत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. "वाढवण बंदराच्या विरोधात आपण बोललो. येथे आंदोलन झाली. शिवसेनेला आंदोलने नवीन नाहीत; परंतु केवळ आंदोलन करून भागणार नाही, तर आंदोलनाबरोबरच हाती सत्ता आणि अधिकार असायला हवेत. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले, तर वाढवण बंदर करण्यासाठी कुणालाही हात लावू देणार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
‘क्लस्टर डेव्हलपमेंट’चा आदेश फाडून फेकू : "गुजरातमधील बंदरे अदानींना दिली आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येतात. वाढवण बंदराचेही तसेच होण्याची शक्यता असून वाढवण बंदर कदाचित अदानींकडे जाऊन या भागातही मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ येऊन येथील पिढी उद्ध्वस्त होईल," असा इशारा त्यांनी दिला. "महाराष्ट्रात केवळ वाढवण बंदराचा प्रश्न आहे असे नाही, तर सात जिल्ह्यातील बंदरांचा, कोळीवाड्यांचा आणि गावठाणांचा गंभीर प्रश्न आहे. आता ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ च्या नावाखाली हे लोक कोळीवाडे उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. आदिवासी, मच्छीमारांना देशोधडीला लावायला निघाले आहेत. हे महाराष्ट्रद्रोही असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’चा आदेश आपण फाडून टाकू," असे ते म्हणाले.
पालघरच्या विकासाचा आराखडा तयार : "वाढवण आणि मुरबे बंदराच्या विकासाला माझा असलेला विरोध लक्षात घेऊन मला मोदी-शाह हे विकास विरोधी ठरवत असले, तरी मी विकास विरोधी नाही," असे स्पष्ट करून ठाकरे म्हणाले की, "पालघरच्या विकासाचा एक आराखडा आपल्या मनात तयार आहे. पालघर हा जिल्हा अतिशय सुंदर आहे. समुद्रकिनाऱ्यांनी नटलेला आहे. या जिल्ह्यात पर्यटन विकास करता येईल. त्याचबरोबर जव्हारसारख्या ठिकाणी ‘हिल स्टेशन’ विकसित करण्यात येईल. या भागात एक विमानतळ आपण सुरू करू. त्यामुळे येथे उद्योजक येतील. उद्योग सुरू होतील."
नव्वद हजार लोक काय घेऊन आले? : "पंकजा मुंडे यांनीच एका भाषणामध्ये महाराष्ट्रात गुजरातचे ९० हजार कार्यकर्ते आले आहेत, असे सांगितले, त्याचा संदर्भ देऊन हे कार्यकर्ते आपल्यावर लक्ष ठेवणार आहेत. माझ्या बॅगा तपासल्या जातात आणि या ९० हजार लोकांच्या बॅगा मात्र का तपासल्या जात नाहीत, हे लोक इथे येऊन राहतात कुठे, काय करतात , ते कुणाकुणाला काय काय देतात याची तपासणी करण्याची आवश्यकता असताना त्याबाबत विचारणा करता त्यांच्याविरुद्ध तक्रार नसल्याचे कारण पुढे केले जाते; परंतु मग माझ्याविरुद्ध काही तक्रार होती का? माझ्या बॅगा का तपासता? असे सवाल करून मी मुद्दा उपस्थित केल्यावर नंतर शाह यांची बॅग तपासण्याचे नाटक केले," असा आरोप ठाकरे यांनी केला.
हात उखडून टाकू : लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन महाविकास आघाडीला मतदान केले, तर अशा महिलांचे फोटो काढून धडा शिकवण्याच्या मुन्ना महाडिक यांच्या इशाऱ्याचा समाचार ठाकरे यांनी घेतला. "महिलांवर हल्ला झाला, तर महिलाच मुन्ना महाडिक यांना तुडवतील. आमच्या बहिणींच्या केसाला हात जरी लावला तर त्याचा हात उखडून टाकू," असा इशारा ठाकरे यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -