नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत पोहोचल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेने कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन केले.
काय म्हणाले पंतप्रधान?
मी आशा करतो की, आपण सर्वांनी कोरोनाचा लसीचा कमीत कमी एक डोस तरी घेतला असेल. आतापर्यंत 40 कोटी जनतेने कोरोनाची लस घेतली आहे. ते सर्व आता बाहुबली झाले आहेत.
ते म्हणाले, कोरोना काळातही संसदेत सार्थक विषयांवर चर्चा व्हायला हवी. कोरोनावर विस्तृत स्वरुपात चर्चा करू शकतो. सभागृहाचे कामकाज कोणत्याही अडथळ्यांविना पार पडेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संसदेत खासदारांच्या कठोर आणि कठीण प्रश्नांचे स्वागत आहे, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, कोरोनाच्या महासंकटामुळे सर्व जगात संकट आहे. यामुळे आमची इच्छा आहे की, संसदेतही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्थक चर्चा व्हावी. सर्व व्यावहारिक सल्ले खासदारांकडून मिळावेत, ज्यामुळे कोरोनावरील उपायांमध्ये सुधारणा करता येईल. देशातील जनतेला ज्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे आहेत, ती उत्तरे द्यायला सरकारची पूर्ण तयारी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा संसद भवन परिसरात पोहोचले त्यावेळी मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. यावेळी माध्यमांना संबोधित करताना त्यांनी स्वत: छत्री पकडली होती.
हेही वाचा - Monsoon Session Live Updates : विरोधी पक्षाच्या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी 2 पर्यंत स्थगित