नवी दिल्ली - दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने सहा संशयित दहशतवाद्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आज(बुधवारी) सकाळीच या सहा दहशतवाद्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 14 सप्टेंबरला सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार या मधील दोन जण पाकिस्तानात दहशती कारवायांचे प्रशिक्षण घेऊन भारतात आलेले आहेत. दिल्लीसह भारतातील प्रमुख शहरे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती आणि यांना अंडरवर्ल्डकडून पैसा मिळाला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिली आहे.
अटकेतील संशयितांची नावे-
अटक करण्यात आलेल्या या संशयित दहशतवाद्यांमध्ये मुंबईचा रहिवासी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, दिल्लीच्या जामिया नगरातील रहिवासी ओसामा उर्फ सामी, यूपीतील रायबरेलीचा रहिवासी मुलचंद उर्फ साधू, तसेच प्रयागराजमधील जिशान कमर, बहराइचा रहिवासी मोहम्मद अबू बकर आणि लखनऊचा राहणारा मोहम्मद आमिर जावेद यांचा समावेश आहे.
हिंदू नेते निशाण्यावर, महाराष्ट्रात करायचा होता स्फोट
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार यामध्ये ओसामा आणि जिशान हे दोघे गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात जाऊन दहशवादी कारवायांचे प्रशिक्षण घेऊन परतले आहे. त्यांना मस्कट मार्गे पाकिस्तानात नेले होते. या दोन्ही संशयितांकडून स्फोटके आणि विदेशी शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. या अटकक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांना भारतातील अनेक देशांमध्ये हल्ले करण्यासाठी पैसा आणि हत्यारांचा पुरवठा केला जात होता. यांच्या निशाण्यावर अनेक हिंदूत्ववादी नेते होते. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अन्य काही राज्यात बॉम्ब स्फोट करण्याचे यांचे नियोजन होते, अशीही माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
हेही वाचा - सणासुदीतील बॉम्बस्फोटाचा उधळला डाव; 6 दहशतवाद्यांना दिल्लीत अटक
हेही वाचा - मोदी सरकारमध्ये दम असेल तर तालिबानींना दहशतवादी घोषित करावे-असदुद्दीन ओवैसी