नवी दिल्ली Parliament Winter Session 2023 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 4 था दिवस आहे. हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाच्या संसदीय समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अश्विनी वैष्णव, डॉ एस जयशंकर आदी उपस्थित होते. तर दुसरीकडं काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत कतारमधील 8 माजी नौदल कर्मचाऱ्यांना फाशीच्या शिक्षेवरुन स्थगन प्रस्तावाची नोटीस बजावली आहे. कतारमध्ये 8 भारतीय नौदलाच्या माजी कर्मचार्यांच्या फाशीच्या शिक्षेवर चर्चा करण्याची मागणी मनीष तिवारी यांनी केली.
भाजपा संसदीय समितीची बैठक : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजपाच्या संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत हिवाळी अधिवेशनाची पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. आज संसदेत गृहमंत्री अमित शाह हे जम्मू काश्मीरविषयक विधेयक राज्यसभेत मांडणार आहे. त्यासह अर्थविषयक चर्चा आजही सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपाचे खासदार छेदी पासवान हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीबाबत निवेदन मांडणार आहेत.
काँग्रेसनं दिला स्थगन प्रस्ताव : भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्यात यावी, अशी मागणी खासदार मनीष तिवारी यांनी केली आहे.
राहुल गांधी सोनिया गांधी आज तेलंगाणात : तेलंगाणात आज काँग्रेस पक्षाचे नेते रेवंथ रेड्डी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस खासदार राहुल गांधी आदी नेते तेलंगानात दाखल झाले आहेत. काँग्रेसनं नुकत्याच तेलंगाणा विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं आहे. त्यामुळे दक्षिणेत कर्नाटकनंतर आता काँग्रेसची तेलंगाणात सत्ता स्थापन होत आहे.
हेही वाचा :