नवी दिल्ली Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भंग करणारा मास्टरमाईंड ललित झा असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर सहावा आरोपी ललित झा अद्याप फरार आहे. काल संसदेत कामकाजादरम्यान दोनजण संसदेत घुसले होते. तर दोघं बाहेर आंदोलन करत होते. तेव्हा ललितही संसदेबाहेर उपस्थित होता. आरोपी नीलम, अमोल यांनी संसदेबाहेर केलेल्या निदर्शनाचा, घोषणाबाजीचा व्हिडिओही बनवला होता. त्याच्याकडं सर्व आरोपींचे फोन होते. ललितनं हा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरलाही व्हॉट्सॲपवर पाठवला होता. यानंतर तो फरार झाला, अशी माहिती समोर येत आहे.
कोण आहे ललित झा : कोलकात्यातील अनेक सार्वजनिक आंदोलनांमध्येही ललित झा सहभागी झाला आहे. बंगालमधील अनेक स्वयंसेवी संस्थांशी त्यांचा संबंध आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल सध्या ललितचा शोध घेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी ललित झा यानं संसदेतील सुरक्षा त्रुटींचा व्हिडिओ एका एनजीओचे संस्थापक नीलाक्ष आइच यांना व्हॉट्सॲपवर शेअर केला होता, असं पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात आदिवासी शिक्षणावर काम करणाऱ्या नीलाक्षनं सांगितलं. आरोपी ललित झा हा त्या संस्थेचा सदस्य होता. ललित झा कोलकाता येथील अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्येही दिसला आहे. नीलाक्षनं सांगितलं की, ललितनं संसदेच्या सुरक्षेचा भंग केल्यावर त्यांच्याशी शेवटचा संपर्क साधला होता. ललितनं दुपारी एक वाजता संसदेबाहेर झालेल्या निदर्शनाचा व्हिडिओही पाठवला होता. ललितनं व्हिडिओ पाठवताना त्यात लिहिलं होतं की, "मीडिया कव्हरेज पाहा. हा व्हिडिओ सुरक्षित ठेवा. जय हिंद.''
संसदेत दोन जण घुसले : प्रत्यक्षात बुधवारी लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारल्या होत्या. त्यानंतर एका व्यक्तीनं त्याच्या बुटातून पिवळ्या रंगाचा स्प्रे काढत गॅसची फवारणी केली होती.
'या' 5 आरोपींना अटक : सर्व आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण एकमेकांच्या संपर्कात आले. पोलिसांनी सागर, मनोरंजन, अमोल, नीलम यांना ताब्यात घेतलं आहे. तर आणखी एक आरोपी विशालला गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. संसदेत पोहोचण्यापूर्वी सर्व आरोपी विशालच्या घरी थांबले होते. तर आरोपी ललितचा शोध सुरू आहे.
हेही वाचा -