नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले असून 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. आज अधिवेशनाचा सातवा दिवस आहे. आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि 9 विरोधी पक्ष नेते लोकसभेत पेगासस मुद्द्यावरून स्थगन प्रस्ताव मांडणार आहेत. मंगळवारी काँग्रेस संसदीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
मंगळवारी घेण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, द्रमुकचे जे कनिमोळी. टीआर बाळू, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे अरविंद सावंत, नॅशनल कॉन्फरन्सचे हसनैन मसूदी, बसपाचे रितेश पांडे, आरएसपीचे एनके रामचंद्रन आणि आययूएमएलचे मोहम्मद बशीर उपस्थित होते. या बैठकीत टीएमसीचा कोणताही नेता सहभागी नव्हता.
पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विविध मुद्यांवरून लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ उडत असल्याने अनेकदा कामकाज तहकूब करण्यात येत आहे. गेल्या 23 जुलैला केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातून कागदपत्रे हिसकावून फाडल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.
कोरोना महामारीत संसदेचे हे दुसरे मान्सून अधिवेशन असणार आहे. सामान्यत: संसदेचे मान्सून अधिवेशन हे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होते. तर स्वातंत्र्यदिनापूर्वी संसदेचे मान्सून अधिवेशन संपते. या अधिवेशनात संसदेची एकूण 19 सत्रे होत असून यात 31 सरकारी कामकाजांचा समावेश असेल. (यात 29 विधेयके आणि दोन वित्तीय विधेयके) सहा अध्यादेशांचे विधेयकांमध्ये रुपांतर केले जाईल.
हेही वाचा - संसदेचे मान्सून अधिवेशन : लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात दोन विधेयके मंजुरी