नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकपल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. अदानी समुहाच्या प्रकरणाची जेपीसी चौकशी करण्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत घोषणाबाजी केल्याने लोकसभेचे कामकाज आज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांची नोटीस : काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी आज अदानी समूहाच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी नोटीस दिली. राज्यसभेच्या अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या नोटीसमध्ये तिवारी म्हणाले की, 'सभागृह शून्य तास, प्रश्नोत्तराचा तास आणि दिवसाच्या इतर कामकाजाशी संबंधित नियमांना स्थगिती देत आहे. या दरम्यान अदानी समूहावर असलेल्या कॉर्पोरेट फसवणूक, राजकीय भ्रष्टाचार, शेअर बाजारातील हेराफेरी, बेकायदेशीर कोळसा खाण वाटप, 6 विमानतळांच्या निविदांना परवानगी देण्यासाठी नियम - कायद्यांमध्ये सुधारणा करणे आदी गंभीर आरोपांवर चर्चा होऊ शकते'. दुसरीकडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागासाठी संसदीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या प्रमुख मंत्र्यांसोबत बैठक घेतली.
विरोधकांची जेपीसीची मागणी कायम : डीएमपी खासदार तिरुची सिवा यांनी नियम 267 अंतर्गत राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची सूचना दिली आणि देशातील कॉर्पोरेट फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात सरकारच्या अपयशावर चर्चेची मागणी केली. काँग्रेस खासदार रणजित रंजन यांनीही या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. कॉर्पोरेट फसवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात सरकारच्या अपयशावर चर्चा करण्यासाठी त्यांनी नोटीस दिली.
भाजप राहुल गांधींच्या माफीवर ठाम : सोमवारी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी सांगितले की, केंद्र सरकार अदानी प्रकरणाच्या संयुक्त संसदीय समितीच्या तपासाला घाबरत आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी, या मागणीवर भाजप ठाम आहे. भारतातील लोकशाहीवर केलेल्या टीकेबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी, असे भाजप सदस्यांनी म्हटले आहे.