नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा आज 16 वा दिवस आहे. संसदेतील आजचे कामकाजही गदारोळाचे बळी ठरले आहे. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 पर्यंत तहकूब केले गेले आहे. चार दिवसांच्या विश्रांतीनंतर आज संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुन्हा सुरु झाले. यापूर्वी गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात चार दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
दोन्ही सभागृहात गदारोळ कायम : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करणे आणि अदानी समूहाविरुद्ध जेपीसी चौकशीची मागणी यावरून सभागृहात सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये तणाव कायम आहे. गेल्या आठवड्यात या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ झाला होता. मात्र, या दरम्यान काही महत्त्वाची विधेयकेही मंजूर करण्यात आली होती.
अदानी मुद्द्यावर जेपीसीची मागणी कायम : काँग्रेस खासदार रंजीत रंजन यांनी आज राज्यसभेत नियम 267 अन्वये कामकाजाच्या निलंबनाची नोटीस दिली आहे. त्यांनी अदानी समूहावरील फसवणूक, भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवस्थापनाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चर्चेची मागणी केली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी अदानी मुद्द्यावर जेपीसीबाबत नोटीस दिली आहे. गेल्या मंगळवारी राज्यसभेत या संदर्भात घोषणा केली गेली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा : लोकसभेच्या पीठासीन अधिकारी रमा देवी यांनी गेल्या बुधवारी जाहीर केले होते की, शुक्रवारी लोकसभेचे कामकाज होणार नाही. यापूर्वी रामनवमीमुळे दोन्ही सभागृहांची बैठक झाली नव्हती. शनिवारी आणि रविवारी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज बंद असते. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 13 मार्चला सुरू आहे. हे अधिवेशन 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील विविध मुद्द्यांवरून सुरू असलेला गदारोळ थांबलेला नाही.