नवी दिल्ली Parliament Security : कोणत्याही व्यक्तीला संसद भवनात प्रवेश करायचा असेल तर एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यानंतरच ती व्यक्ती संसदेत प्रवेश करू शकते. सहसा कोणत्याही व्हिजिटरसाठी फक्त खासदार पास जारी करतात. जेव्हा ती व्यक्ती संसद भवनात प्रवेश करते तेव्हा तिच्याकडे कोणतंही हत्यार किंवा प्राणघातक साहित्य नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची असते. बुधवारी घडलेल्या घटनेनं कुठेतरी दोष नक्कीच आहेत, हे सिद्ध झालं.
- पहिला स्तर - संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत प्रामुख्यानं चार स्तर असतात. पहिला स्तर दिल्ली पोलिसांचा आहे. त्याला बाह्य स्तर देखील म्हणतात. संसद भवनात प्रवेश करताच पहिली तपासणी त्यांच्याकडून केली जाते.
- दुसरा स्तर - दुसऱ्या स्तराची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलांची आहे. यामध्ये CRPF, ITBP, NSG इत्यादींचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक SWAT देखील यात सहभागी असतं. संसदेच्या आवारात कधीही कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात.
- तिसरा स्तर - तिसरा स्तर पार्लमेंट ड्युटी ग्रुपचा आहे. १३ डिसेंबर २००१ च्या संसद हल्ल्यानंतर त्यांची स्थापना झाली. दहशतवादविरोधी कारवाया करण्यासाठी ते नेमले आहेत. त्यांची स्वतःची वैद्यकीय टीम आणि स्वतःची संवाद यंत्रणा असते. संसद संकुलात त्यांची संख्या १५०० पेक्षा जास्त आहे.
- चौथा स्तर - हे संसदेच्या सुरक्षा सेवेतील कर्मचाऱ्यांचं बनलं आहे. संसद भवनातील सुरक्षा व्यवस्था पाहणं ही त्यांची जबाबदारी असते. हा सर्वात आतील थर आहे. एकदा तुम्ही संसद भवनात प्रवेश केला की तुमच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांची असते. ते खासदार, सभापती आणि अध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेवरही लक्ष ठेवतात. सभागृहातील मार्शल देखील त्यांना अहवाल देतात. जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा त्यांना सुरक्षा देण्यासाठी ते SPG सोबत समन्वय साधतात.
संसदेची सुरक्षा व्यवस्था कोण पाहतं : सुरक्षा विभागाचे संयुक्त सचिव संसदेची सुरक्षा व्यवस्था पाहतात. त्यांच्या खाली सुरक्षेचे अनेक स्तर आहेत. यामध्ये दिल्ली पोलिसांपासून केंद्रीय दलापर्यंत अनेकजण तैनात आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज शस्त्रं आणि मशीन्स असतात. सुरक्षा अधिकाऱ्यांचा बॉस असिस्टंट डायरेक्ट रँकचा अधिकारी असतो. संसद भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणं हे त्यांचं काम आहे. पासचा गैरवापर जर कोणी करत असेल तर त्यांना ते रोखावं लागतं. अशा परिस्थितीत त्यांना सुरक्षा उपसंचालकांना कळवावं लागतं. त्यांच्या क्षेत्रात सर्व नियमांचं पूर्णपणे पालन केलं जाईल याची खात्री करण्याचं काम क्षेत्र प्रभारींचं आहे. प्रत्येक क्षेत्रासाठी एक पर्यवेक्षक असतो.
पास देण्यावर बंदी घातली : खासदारांना गॅलरीत जाण्यासाठी आणि संसदेचे कामकाज पाहण्यासाठी पास दिले जातात. मात्र, आजच्या घटनेनंतर हे पास देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक पासला आयडी क्रमांक असतो. संसदेच्या संकुलात प्रवेश केल्यावर विविध ठिकाणी मेटल डिटेक्टर आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग लावले जातात. तुमच्याकडे अशी कोणतीही वस्तू असेल तर ते शोधून काढतात. जर तुमच्याकडे बॅग असेल तर ती योग्य प्रकारे तपासली जाते आणि त्यानंतर त्यावर एक स्टिकर चिकटवलं जातं. ती बॅग तीन वेळा तपासली जाते.
संपूर्ण यंत्रणा हादरली : संसदेच्या आत कोणत्याही व्यक्तीला शस्त्रे नेण्याची परवानगी नाही. केवळ सुरक्षा कर्मचाऱ्यांना शस्त्रे घेऊन आत जाण्याची परवानगी आहे. मात्र, बुधवारी घडलेल्या घटनेनं संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. एवढी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही दोन तरुणांनी बुटामध्ये स्मोक बॉम्ब लपवून आत प्रवेश कसा केला, असा प्रश्न विचारला जात आहे.
हे वाचलंत का :