दरभंगा (बिहार) Parliament Attack : गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि तपास यंत्रणांचे अधिकारी संसदेच्या सुरक्षा भंगाच्या घटनेतील मुख्य सूत्रधार ललित झा याच्या घरी चौकशीसाठी जात आहेत. दरम्यान, बुधवारी त्याच्या घरावर एक पोस्टर चिटकवलेलं आढळून आलं. या पोस्टरची सध्या परिसरात जोरदार चर्चा आहे. या पोस्टरमध्ये ललित आणि त्याच्या साथीदारांचं वर्णन 'क्रांतिकारी योद्धा' असं करण्यात आलंय.
काय आहे पोस्टरमध्ये : ललित झा याच्या घराबाहेर जे पोस्टर लावण्यात आलं, त्यात ललित झा, नीलम आझाद, मनोरंजन सागर, अमोल शिंदे आणि महेश यांचे फोटो आहेत. हे सर्व संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी प्रमुख आरोपी आहेत. या पोस्टरमध्ये 'आम्हाला भूक, बेरोजगारी आणि महागाईपासून मुक्ती हवी', असं लिहिलं आहे. तसेच या पोस्टरमध्ये राष्ट्रीय लोक आंदोलनाच्या कार्याध्यक्षा कल्पना इमानदार यांच्या छायाचित्रासोबत त्यांचा मोबाईल नंबरही नमूद करण्यात आलाय.
पोस्टर कोणी लावलं : हे पोस्टर कोणी लावलं याबाबत ललित झा याच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, "बुधवारी संध्याकाळी हरियाणा आणि मुंबईतून दोन अज्ञात लोक त्यांच्या घरी आले होते. आमची भेट घेतल्यानंतर त्यांनी ललितला भेटण्यासाठी तुमच्या प्रवासाची व्यवस्था करू, असं सांगितलं. ललित हा भित्रा नसून तो क्रांतिकारी योद्धा असल्याचं ते म्हणाले. निघताना त्यांनी हे पोस्टर चिकटवलं". दुसरीकडे, पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांना याबाबत कोणतीही माहिती नाही. ते याचा शोध घेतील.
ललित झा याच्या कुटुंबीयांची चौकशी : दिल्ली पोलीस आणि एटीएसची टीम १९ डिसेंबरला दरभंगा जिल्ह्यातल्या रामपूर उदय गावात ललित झा याच्या घरी पोहोचली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. ललित झाचे वडील देवानंद झा, आई मंजुळा, लहान भाऊ हरिदर्शन उर्फ सोनू आणि शंभू झा यांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी ललितच्या मालमत्तेबाबत सर्व माहिती मिळवली. ललित आणि त्याच्या साथीदारांनी १३ डिसेंबरला संसदेच्या सुरक्षेचा भंग केला होता.
हे वाचलंत का :