नवी दिल्ली Parliament Attack : १३ डिसेंबर रोजी संसदेची सुरक्षा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सर्व ६ आरोपींना अटक केली आहे. शनिवारी सहाव्या आरोपीला अटक झाली. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. आता या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होत झालेत.
स्वतःला पेटवून घेण्याचीही योजना होती : अटक करण्यात आलेल्या आरोपींनी लोकसभेत उडी मारून स्मोक बॉम्ब फोडण्याच्या योजनेला सहमती देण्यापूर्वी स्वतःला पेटवून घेणं आणि पत्रकं वाटणं यासारख्या पर्यायांचाही विचार केल्याचं चौकशीत उघड झालंय. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे की, त्यांची स्वतःला पेटवून घेण्याची योजना होती.
काय घडलं : आरोपी सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी शून्य तासात प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि 'कॅन'मधून पिवळा गॅस उडवत घोषणाबाजी केली. त्यानंतर खासदारांनी त्यांना पकडलं. त्याचवेळी, अमोल शिंदे आणि नीलम देवी या अन्य दोन आरोपींनी संसद भवनाबाहेर स्मोक बॉम्ब फोडून 'हुकूमशाही चालणार नाही' अशा घोषणा दिल्या. पाचवा आरोपी ललित झा यानं कथितपणे संसदेबाहेर झालेल्या निदर्शनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले.
सरकारला संदेश द्यायचा होता : या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'या योजनेला अंतिम रूप देण्याआधी आरोपींनी अन्य काही मार्गांचा विचार केला होता. ज्याद्वारे ते सरकारला त्यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचवू शकतील. ते म्हणाले की, आरोपींनी आधी स्वतःचं शरीर अग्निरोधक पेस्टनं झाकून आत्मदाह करण्याचा विचार केला होता. परंतु नंतर त्यांनी हा विचार सोडून दिला. त्यांनी संसदेत पत्रकं वाटण्याचाही विचार केला होता. शेवटी संसदेत स्मोक बॉम्ब फोडण्याचा पर्याय निवडण्यात आला.
भाजपा खासदाराचा जबाब नोंदवणार : या प्रकरणाचा तपास करणारी दिल्ली पोलिसांची स्पेशल सेल, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार प्रताप सिम्हा यांचाही जबाब नोंदवणार आहेत. येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, लोकसभेची सुरक्षा भंग करणार्या दोन तरुणांना खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर पास मिळाला होता. सध्या या पाचही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सहाव्या आरोपीला अटक : या प्रकरणातील सहाव्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. महेश कुमावत असं त्याचं नाव आहे. तो देखील या संपूर्ण कटाचा एक भाग होता. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील रहिवासी असलेला महेश, ज्या दिवशी ही घटना घडली (१३ डिसेंबर) त्या दिवशी दिल्लीत आला होता. मुख्य सुत्रधार ललित झा घटनेनंतर राजस्थानमध्ये महेशच्या ठिकाणावर लपून बसला होता. सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या चार आरोपींचे मोबाईल नष्ट करण्यात महेशचाही सहभाग होता.
हे वाचलंत का :