इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा काश्मीरप्रश्नी वक्तव्य केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना पाकिस्तानात राहण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार देऊ, त्यासाठी सार्वमत घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. सोबतच भारतासोबत चर्चा सुरू करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी काश्मीरला विशेष दर्जा पुन्हा देण्याची अट घातली आहे.
द्विपक्षीय चर्चा बंद -
काश्मीरला विशेष दर्जा भारताने पुन्हा दिला तर चर्चा करू, असे खान यांनी म्हटले आहे. काश्मिरी नागरिकांना पाकिस्तानात राहायचे किंवा स्वतंत्र राहायचे हा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही त्यांना देऊ, असे इम्रान खान म्हणाले. पाकिस्तान दरवर्षी काश्मीर एकता दिन साजरा करतो. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९ साली भारताने काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारत पाकिस्तानातील संबंध ताणले आहेत. द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली असून चर्चेची शक्यता मावळली आहे.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात काश्मीरला पाठिंबा देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या रॅलीवर ग्रेनेड हल्ला झाला. यात १६ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची कोणीही जबाबदारी स्वीकारली नाही. शिबी जिल्ह्यात ही घटना घडली.