भोपाळ - मध्यप्रदेशातील झाबुआ या आदिवासी जिल्ह्यातील भूरीबाई या आदिवासी समाजातील महिलेला नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. भूरीबाई यांचा जन्म पिटोल गावात झाला. लहान वयातच विवाह झाल्याने १७ व्या वर्षी पोट भरण्यासाठी भोपाळ शहराचा रस्ता धरला. शहरातील भारत भवन या सांस्कृतीक आणि कला संग्रहालयात मजूरी करण्यासाठी आल्या तेव्हा आपण पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा प्रवास करू, अशी कल्पनाही त्यांनी कधी केली नसेल. मजूर म्हणून संग्रहालयात काम करताना त्यांच्या कलागुणांना वाव मिळत गेला. भूरीबाई यांनी आपल्या जीवनप्रवासाबाबत ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली आहे.
बालपण गरीबी आणि संघर्षात गेले
भूरीबाई यांनी सांगितले की, त्यांना बालपणापासून चित्रकलेचा छंद होता. आदिवासी समाजातील असल्याने गावामध्ये स्थानिक चित्रकला होती. घराच्या भिंतीवर बालपणी चित्रे काढत असे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कायम संघर्ष करावा लागला. जेव्हा दहा वर्षांची होते तेव्हापासून मजूरी करण्याासाठी आईवडीलांसोबत बाहेरगावी जावे लागे. एकदा आमच्या घराला आग लागली. त्यात घरातील सगळे सामान जळून खाक झाले. तेव्हातर उपाशी झोपण्याची वेळ याली होती. मात्र, आईवडिलांनी मजूरी करत आम्हाला मोठे केले.
अल्पवयीन असताना लग्न झाले -
भूरी बाई सांगतात, सतरा वर्षाच्या असताना आई वडिलांनी लग्न उरकून टाकले. लग्न झाल्यानंतरही मजूरी करण्यासाठी भोपाळमध्ये आले. शहरातील भारत भवन या संग्रहालयात मजूर म्हणून काम सुरू केले. तेथे संग्रहालयाचे प्रमुख जय स्वामीनाथन यांची भेट झाली. सर्व मजूरांना बोलावून त्यांनी आमची विचारपूस केली. तुम्हाला कोणती कला येते? गाव कोणते? तेथील संस्कृती कशी आहे? याबाबत माहिती घेतली. मला चित्र काढण्याबाबत विचारण्यात आले. मात्र, मी तेव्हा खूप घाबरले होते. लहानपणी चित्र काढायचे पण नंतर चित्र काढत नसल्याने ब्रशही हातात धरता येत नव्हता. मात्र, हळूहळू चित्र काढण्यास सुरुवात केली. स्वामीनाथन यांनी प्रोत्साहन दिले. त्यानंतर आत्मविश्वास येत गेला. पतीनेही या कामात साथ दिली, असे त्यांनी सांगितले.
ग्रामीण आदिवासी संस्कृती चित्राच्या माध्यमातून रेखाटली -
भूरीबाई या भिल्ल समाजातून येत असल्याने लहानपणी गावात जे पाहिले अनुभवले ते त्यांनी चित्राद्वारे कॅव्हास पेपरवर आणि भिंतीवर उतरवले. शेतातील कामे, गावगाडा, ग्रामीण उत्सव, बैलगाडी, जंगली आणि पाळीव प्राणी यांची चित्रे त्यांनी काढायला सुरूवात केली. ही चित्रे सर्वांच्या पसंतीस उतरू लागली. त्यामुळे त्यांनी संग्रहालयात कलाकार म्हणून काम सुरू केले. त्यांनी काढलेली चित्रे संग्रहालयातील आकर्षण ठरू लागले. या कामामुळे त्या सगळीकडे ओळखल्या जाऊ लागल्या. राज्य सरकारने १९८६ साली त्यांना अहिल्यादेवी सन्मान देऊन गौरविले. त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन थेट अमेरिकेतही भरवण्यात आले. त्यांना आता भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे. एका आदिवासी भिल्ल समाजातील महिलेने आपल्या कलेतून नाव कमावल्याचा हा प्रेरणादायी प्रवास अनेकांना प्रोत्साहन देत राहील.