पाटणा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर देशातील वैद्यकीय व्यवस्था निकामी ठरताना दिसून येत आहे. त्यातच प्रशासनाचा निष्काळजीपणा कोरोनाच्या पथ्यावर पडतो आहे. बिहारच्या सुपौैल जिल्ह्यामध्ये एका रुग्णालयाचा असाच एक ढिसाळ कारभार समोर आला आहे. एका कोरोना रुग्णाने ऑक्सिजनची वाट पाहत रुग्णालयाच्या बाहेरच आपले प्राण सोडले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णाला ऑक्सिजन आणून लावला.
कोविड केंद्रावर नव्हता डॉक्टरांचा पत्ता..
मृताच्या नातेवाईकाने सांगितले, की रुग्णाची तब्येत ढासळल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. याठिकाणी रुग्णाला सुरुवातीला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल ६५ होती. जेव्हा या रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले, तेव्हा तिथे डॉक्टरही उपस्थित नव्हते. काही वेळानंतर जेव्हा डॉक्टर हजर झाले, तेव्हा रुग्णाची गंभीर परिस्थिती पाहून त्याला तातडीने दुसरीकडे हलवण्यास सांगण्यात आले. मात्र, ही प्रक्रिया सुरू असतानाच कोविड केंद्राच्या पायऱ्यांवरच या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.
रुग्ण स्वतःच सांगत होता ऑक्सिजन द्या..
नातेवाईकांनी सांगितले, की ते वारंवार रुग्णवाहिकेचीही मागणी करत होते. एवढेच नव्हे, तर रुग्ण स्वतः आपल्याला ऑक्सिजन हवा असल्याचे सांग होता. मात्र, कोविड केअर सेंटर प्रशासनाने या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केले. तब्बल चार तास रुग्णाचे नातेवाईक उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना या गोष्टींची मागणी करत होते. मात्र, त्यांच्या मागण्या कोणी ऐकण्यापूर्वीच या रुग्णाने आपले प्राण सोडले.
चौकशीचे दिले आदेश..
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल ३५ पर्यंत खाली आली होती. मात्र तरीही वैद्यकीय कर्मचारी याला गांभीर्याने घेत नव्हते. याबाबत नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर आता सुपौल पोलीस ठाण्याचे प्रमुख संदीप कुमार सिंह आणि अपर अनुमंडल पदाधिकारी प्रमोद कुमार कोविड सेंटरवर पोहोचले. त्यांनी नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अपर एसडीएम यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हेही वाचा : 'गोमूत्र पिल्याने होत नाही कोरोना'; उत्तर प्रदेशच्या आमदाराचा व्हिडिओ व्हायरल..