नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी 16 जानेवरीपासून लसीकरण करण्यात येत आहे. यातच अनेक ठिकाणांवरून लसीचा तुडवडा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेक राज्यांनी आपल्याकडे लसीचा पुरवठा नसल्याची तक्रार केली आहे. मात्र, लसीचा पुरवठा करण्यात येत असल्याचे केंद्राकडून सांगण्यात येत आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सध्या 2 कोटीपेक्षा जास्त कोरोना लसीच्या मात्रा आहेत. तसेच येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये त्यांना आणखी लसीचा पुरवठा करण्यात येईल, असे केंद्र सरकारने सोमवारी सांगितले.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सरकारने 20 कोटींपेक्षा जास्त (20,76,10,230) कोरोना लसीच्या मात्रा मोफत पुरवल्या आहेत. यात वाया गेलेल्या लसीच्या मात्रांचादेखील समावेश आहे. अद्याप त्यांच्याकडे 2 कोटीपेक्षा जास्त लसींच्या मात्र उपलब्ध आहेत. तसेच येत्या तीन दिवसांमध्ये त्यांनी 2 लाख 94 हजार 660 लसीच्या मात्रा पुरवल्या जातील, असे केंद्राने स्पष्ट केले.
देशातील आजची कोरोना स्थिती :
- एकूण कोरोनाबाधित रुग्ण - 2 कोटी 49 लाख 65 हजार 463
- एकूण कोरोनामुक्त रुग्ण - 2 कोटी 11 लाख 74 हजार 390
- एकूण सक्रिय रुग्ण - 35 लाख 16 हजार 997
- कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू - 2 लाख 74 हजार 390
- एकूण लसीकरण संख्या - 18 कोटी 29 लाख 26 हजार 460