नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्ली-उत्तरप्रदेश सीमेवरील गाझीपूर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी विरोधी पक्षाचे नेते सीमेवर दाखल झाले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत या ठिकाणी आंदोलन करत आहेत. खासदार सुप्रिया सुळेदेखील विरोधी पक्षांच्या प्रतिनिधी मंडळात सहभागी आहेत. दरम्यान, पोलिसांनी सर्व नेत्यांना सीमेवर अडवले आहे.
सरकारने अहंकार सोडून तोडगा काढावा -
भारताच्या सीमांवरही अशी संतापजनक परिस्थिती नसेल तशी स्थिती दिल्ली गाझीपूर सीमेवर आहे. मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. येथे शेतकऱ्यांना पाण्याची, वीजेची कोणतीही सोय नाही. मोठ्या संख्येने पोलीस येथे तैनात आहेत. आंदोलन करणारेही शेतकरी आहेत आणि त्यांना अडवणारे पोलीस हे देखील शेतकऱ्यांची मुले आहेत. सरकारने अहंकार सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा. आता जी परिस्थिती सीमेवर आहे, तीचा मी निषेध करते, असे सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
रस्त्यावर बसवलेले खिळे काढण्यास सुरूवात -
दिल्ली गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्त्यांवर खिळे आणि लोखंडी रॉड रोवण्यात आले होते. याबाबत मोठी टीका झाल्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी खिळे आणि लोखंडी रॉड काढण्यास सुरूवात केली आहे. शेतकरी आंदोलन आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.
संजय राऊत यांनाही घेतली आंदोलकांनची भेट -
आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊतही गाझीपूर सीमेवर गेले होते. यावेळी त्यांनी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टीकैत तसेच आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर मोठे खिळे लावल्यावरून राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. दिल्ली पोलिसांना चीनच्या सीमेवर पाठवले पाहीजे, अशी टीका त्यांनी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर आम्ही आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. संपूर्ण महाराष्ट्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहेत. हे सांगायसाठी आम्ही राकेश टिकैत यांनी भेट घेतल्याचे संजय राऊत म्हणाले होते.