गोवा - विरोधी पक्षांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची सरकार समर्पक उत्तर देत नसून सरसकट विधानसभेचे काम रेटून नेत असल्याचा आरोप गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाले आहे. विरोधकांनी खाण बंदी, कोविड, म्हादई नदी आदी प्रश्न विधानसभेत उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधारी भाजपा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारने विरोधकांच्या मागणीला धुडकावून लावत विधानसभेचे कामकाज रेटून नेत असल्याचा चित्र सभागृहात दिसून आले.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, दक्षिण रेल्वे ते पश्चिम रेल्वे जोड प्रकल्प, गोव्याच्या पर्यावरणासाठी घातक असून याबाबद्दल जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश असून सरकारने यावर वेळीच तोडगा काढावा, अशी मागणी अपक्ष आमदार रोहन खवटे यांनी केली आहे.
'सर्व प्रकल्प हे नियमांच्या आधीन राहूनच'
गोव्यात होणारे सर्व प्रकल्प हे जनतेच्या पाठिंब्याने आणि सर्व नियमांना धरूनच असल्याची कबुली मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली
'सरकार बोलू देत नाही'
विधानसभेत म्हादइ नदी, कोविड, खाण बंदी, महापूर या प्रश्नावर तसेच राज्याच्या बजेट विषयी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नावर सरकार समर्पक उत्तर देत नसून आमची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे.
'सरकारला फक्त अधिवेशनासाठी कोविड लागतो राजकीय नेत्यांच्या दौऱ्यासाठी नाही'
सरकार हे विरोधकांना पुरते घाबरले म्हणूनच त्यांनी तीन दिवस अधिवेशन ठेवले आहे. फक्त अधिवेशनासाठी कोविडचे कारण, मग गोव्यात राजकीय नेत्यांचे दौरे होतात तेव्हा त्यांना कोविड लागत नाही का? असा टोला पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सरकारला लगावला आहे.