कोलकाता : देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. हावडा-पुरी-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या विंडस्क्रीनचे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि वीज पडल्याने रेल्वेच्या काचा फुटल्या आहेत, त्यामुळे रेल्वेने आजची ट्रेन रद्द केली आहे.
ट्रेनच्या विंडशील्डचा चक्काचूर : ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात रविवारी वादळी वाऱ्यादरम्यान पुरी-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसवर तीन झाडं पडली. त्यामुळे ट्रेनच्या विंडशील्डचा चक्काचूर झाला आणि ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त काळ थांबल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. झाड पडल्याने ट्रेनच्या खिडकीची काच फुटली आणि फांद्या 'पँटोग्राफ'मध्ये अडकल्या होत्या, त्यामुळे ट्रेनचे कामकाज विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले.
ट्रेन पुरीहून हावड्याला जात होती : या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे दक्षिण पूर्व रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, ही घटना बैतरणी रोड आणि मांझी रोड स्थानकादरम्यान जाजपूर केओंझर रोड स्टेशनजवळ संध्याकाळी 5.45 च्या सुमारास घडली. ट्रेन पुरीहून हावड्याला जात होती. अधिकाऱ्याने सांगितले की, ही ट्रेन सुमारे ३ तास तिथे अडकली होती आणि त्यानंतर सकाळी 8.05 वाजता डिझेल इंजिन लावून तिथून पुढे निघाली. झाडाच्या फांद्या पडून ओव्हरहेड वायर तुटले. दक्षिण पूर्व रेल्वेने सांगितले की, काही दुरुस्तीचे काम करणे आवश्यक असल्याने सोमवारी अनेक गाड्यांच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी ट्रेनचे व्यावसायिक कामकाज सुरू : 21 मे रोजी पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या कटक-भद्रक सेक्शनवर झालेल्या वादळामुळे झालेल्या नुकसानाची दुरुस्ती करण्यासाठी सोमवारी 22895/22896 हावडा पुरी हावडा वंदे भारत एक्सप्रेस रद्द राहील, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. हावडा-पुरी-हावडा वंदे भारत एक्स्प्रेसला गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला होता. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर शनिवारपासून रेल्वेचे व्यावसायिक कामकाज सुरू झाले होते.
हेही वाचा : 1. Satyapal Malik On Lok Sabha Elections : 2019 च्या लोकसभा निवडणुका सैनिकांच्या मुद्द्यावर लढल्याचा सत्यपाल मलिकांचा आरोप