भुवनेश्वर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्बंध लागू करण्यात आले असूनही नियमांचे पालन होत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या ओडिशामधील एका कलश यात्रेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागरिकांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवले आहे. या यात्रेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत शेकडो महिला हजर होत्या.
ओडिशामधील गंजम जिल्ह्यात ही कलश यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या यात्रेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून कलश यात्रा थांबवली. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.
अंत्यविधीला शेकडो लोकांची गर्दी -
उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये 11 मेला एका मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यविधीला शेकडो लोकांनी गर्दी केल्याचा प्रकार समोर आला होता. रविवारी बदायूंमधील मुस्लिम धर्मगुरू अब्दुल हमीद मोहम्मद सलिमुल कादरी यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी कोविडच्या नियमांचे उल्लंघन करत शेकडो लोक हजर होते. त्यामुळे कलम १८८ आणि इतर संबंधित कलमांतर्गत याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात निर्बंध लागू करण्यात आले असूनही, एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
हेही वाचा - कर्नाटक: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'त्याने' दाखविला साप, मिळाली लगेच वाट!